मोखाबर्डीची पाईपलाईन मातीत

By admin | Published: June 28, 2017 02:53 AM2017-06-28T02:53:54+5:302017-06-28T02:53:54+5:30

विदर्भातील माती भुसभुशीत असल्याने जमिनीला लवकरच भेगा पडतात. स्वाभाविकच मोखाबर्डी प्रकल्पाचाही ‘स्पॉट’ तंतोतंत तसाच आहे.

Mochabardi's pipeline soils | मोखाबर्डीची पाईपलाईन मातीत

मोखाबर्डीची पाईपलाईन मातीत

Next

अधिकारी, कंत्राटदार मालामाल : सिंचनाअभावी शेतकऱ्यांचे हाल
अभय लांजेवार / शरद मिरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : विदर्भातील माती भुसभुशीत असल्याने जमिनीला लवकरच भेगा पडतात. स्वाभाविकच मोखाबर्डी प्रकल्पाचाही ‘स्पॉट’ तंतोतंत तसाच आहे. याचाच आधार घेत तर्कशुद्ध आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने मोखाबर्डी योजनेची रचना आखल्या गेली. कंत्राट देताना करारनाम्यात अनेक बाबी नमूदही करण्यात आल्या. परंतु या बाबींना बगल देत कंत्राटदाराने रेतीवर टाकावयाची पाईपलाईन चक्क मातीत टाकून, दाबून भ्रष्टाचाराला खतपाणी घातल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. या माती प्रकरणाची पोलखोल करून लाखो रुपयांची ‘मलाई’ कुणाच्या घशात गेली याचा पर्दाफाश करण्याची मागणी जोर धरत आहे. केंद्र व राज्य शासन या योजनेला ‘आदर्श’ प्रकल्प करण्याच्या तयारीत आहे. असे असताना या योजनेला ‘माती’चे गालबोट लागावे ही बाब गंभीर असल्याच्या प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहेत;. सोबतच ‘रेती दाखवा अन् बक्षीस मिळवा’ अशी उपहासात्मक चर्चा केली जात आहे.
या प्रकल्पाचे काम १५०० एचपी क्षमता असलेल्या १५ पंपांच्या माध्यमातून चालविले जाणार आहे. पंपहाऊसपासून साडेचार किमीच्या अंतरावर तीन रांगेत सुमारे १,८०० पाईप जोडले जातील. तीनपैकी दोन रांगांचे काम जवळपास पूर्णत्वाकडे आहे.
तिसऱ्या रांगेच्या खोदकामात खडक लागल्याने डिलिव्हरी चेंबरलगतच्या कामाची गतीही मंदावली आहे. पाईपलाईनचे काम करताना पाईपच्या आत पाईप टाकण्याचे काम केले जात आहे. सदर पाईप जोडले जात असताना प्रत्येक पाईपखाली ३० एमएम रेतीचा थर टाकणे गरजेचे आहे. जमिनीला हादरविणाऱ्या आणि पाईपमधून धो धो वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह भुसभुशीत जमिनीला भेगा पाडत असतो. या भेगा पाईपसाठी धोकादायक ठरतात.
अशातच जमिनीला भेगा पडल्यास या भेगांमध्ये पाईपखाली टाकण्यात आलेली रेती समाविष्ट होते. यामुळे वितरण प्रणालीला कोणताही धोका होत नाही. ही बाब अतिशय महत्त्वपूर्ण आणि तेवढीच गंभीर होत असताना कंत्राटदाराने या कामात हयगय केल्याचे बोलले जात आहे. ज्या ठिकाणी पाईपलाईन नजरेस पडते अशा ठिकाणी थोडी फार रेती टाकून उर्वरित पाईपलाईनखाली माती टाकून हे काम करण्यात आले आहे.

अधिकाऱ्याची बोलती बंद
आंभोरा उपसा सिंचन विभाग भिवापूरचे कार्यकारी अभियंता डॉ. हितेंद्र चांदेवार यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने चर्चा केली. १५ जुलैपर्यंत सदर योजना उभी होईल. योजना कार्यान्वित व्हायला १५ दिवस अथवा तीन महिनेही लागू शकतात, असे उत्तर दिले. रेतीऐवजी माती टाकल्याचा प्रताप कंत्राटदाराने केल्याची बाब कानावर टाकताच ते काही मिनिटे काहीच बोलले नाही.
पाईपला पडल्या भेगा
पाईपलाईनच्या सभोवताल सिमेंटचे आवरण केल्या जाते. सिमेंटचे केलेले आवरण बघताच त्याचा दर्जा लक्षात येतो. सद्यस्थितीत पाईपलाईनच्या सभोवताल करण्यात आलेल्या या आवरणाला आतापासूनच भेगा पडल्याचे दिसून येते. त्यावरून हे काम कोणत्या दर्जाचे आहे, हे विचारायला नको.

Web Title: Mochabardi's pipeline soils

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.