लुटारूंवर मोक्का
By Admin | Published: February 10, 2016 03:25 AM2016-02-10T03:25:27+5:302016-02-10T03:25:27+5:30
उपराजधानीतील विविध भागात हैदोस घालणाऱ्या लुटारूंच्या एका टोळीवर पोलिसांनी मोक्का लावला.
पोलिसांचे टार्गेट : गुंडांसोबतच आता चोर-लुटारूंची यादी
नागपूर : उपराजधानीतील विविध भागात हैदोस घालणाऱ्या लुटारूंच्या एका टोळीवर पोलिसांनी मोक्का लावला. पोलीस उपायुक्त शैलेष बलकवडे आणि ईशू सिंधू यांनी आज पत्रकारांना ही माहिती दिली. चोर-लुटारूंवर मोक्का लावल्याची नागपूरच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.
संतोष आंबेकर, राजू भद्रे, गोल्डी भुल्लर या गुंडांच्या टोळ्यांवर मोक्का लावून पोलिसांनी गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण करण्यात यश मिळवले. त्यांच्यानंतर आता पोलिसांनी चोर-लुटारूंची यादी तयार केली असून, लुटारूंच्या टोळीवर मोक्का लावून पोलिसांनी आता गुन्हेगारांसोबतच चोर-लुटारूंनाही कायद्याच्या बडग्याने ठेचून काढण्याची तयारी चालविली आहे.
टोळीचा म्होरक्या घोडी नाचविणारा
नागपूर : शेख सलमान शेख शकील (वय १९, आझाद कॉलनी, मोठा ताजबाग), शेख रफीक शेख शब्बीर (वय २१, बाबा फरीदनगर, गुलशनबाग), गुरुदयाल पंचम खांडेकर (वय २३, बाराखोली), प्रफुल्ल ताराचंद चौधरी (वय २१, रा. जामगाव, चंद्रपूर), जवाई ऊर्फ राजू प्यारेलाल शेंडे (वय ४०) आणि गुलरेज नासीर बक्श (वय २०, रा. सक्करदरा) अशी मोक्का लावलेल्या लुटारूंची नावे आहेत. त्यांच्या टोळीतील फईम महेबूब शेख (वय १९, रा. मोठा ताजबाग), मोहसीन शेख हसन (वय १८, रा. आझाद कॉलनी) आणि अन्य एका अल्पवयीन आरोपीचाही समावेश आहे. त्यांच्यावर लुटमारीचे गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु कोणताही पूर्वगुन्हेगारी अहवाल नसल्यामुळे त्यांना मोक्काच्या कारवाईतून वगळण्यात आल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
लुटारूंच्या या टोळीतील गुंडांबाबत माहिती देताना सिंधू यांनी सांगितले, टोळीचा म्होरक्या शेख सलमान शेख शकील आहे. तो वरातीत घोडे नाचविण्याचे काम करायचा. मात्र, त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्याचे शौकपाणी पूर्ण होत नसल्याने त्याने लुटमार करणाऱ्यांची टोळी बनविली. टोळीतील शेख शफीक भाजी विकायचा. गुरुदयाल तांडेकर मोलमजुरी करीत होता. प्रफुल्ल चौधरी बेरोजगारी आणि उपासमारीला कंटाळून नागपुरात पळून आला. त्याने दिघोरी उड्डाणपुलाखाली आपला डेरा टाकला. आरोपी राजू शेंडे, गुलरेज बक्श तसेच अल्पवयीन मुलगा बेरोजगार आहे. ओळखी झाल्यानंतर हे सर्व सलमान घोडीवाल्यांच्या टोळीत सहभागी झाले. ही टोळी शहराबाहेर आऊटर रिंगरोडवर लुटमार करायची. अनेकदा यांचे टार्गेट प्रेमीयुगुल असायचे.
लज्जेखातर अनेक जण पोलिसांकडे तक्रारी करण्याचे टाळायचे. त्यामुळे या टोळीचे फावत होते. त्यांनी हुडकेश्वर, नंदनवन, हिंगणा परिसरात अनेक लुटमार केल्याचे उघडकीस आले आहे. हुडकेश्वरचे पोलीस कर्मचारी संदीप गुंडलवार, गुरुदेव कुंभलकर, नितीन आकोते, पंकज तांबडे,
सतीश ठाकरे, विलास चिंचुलकर, देवेंद्र शर्मा, नीलेश ढोणे, नरेश तुमडाम यांनी या टोळीला जेरबंद करण्यात महत्त्वाची भूमिका वठविली.
पोलिसांना रोख पुरस्कार
या टोळीला जेरबंद करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या पोलीस शिपाई आनंद कांबळे, संजय पडघाम आणि वाहनचालक अरुण प्रचंड यांनी महत्वाची भूमिका वठविली. त्यांना दहा हजारांचा पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त सिंधू आणि बलकवडे यांनी दिली. यावेळी सीताबर्डीचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार, रवींद्र कापगते, हुडकेश्वरचे ठाणेदार पवार, एस. सी. झावरे, के. व्ही चौगुले आदी उपस्थित होते.
लुटमारीतून अय्याशी
लुटमारीतून मिळालेल्या पैशातून त्यांनी अय्याशी सुरू केली. त्यामुळे आलेला पैसा त्यांच्याकडे थांबत नव्हता. म्हणून ते वारंवार गुन्हे करायचे. रविवारी रात्री अशाच प्रकारे लुटमार करून पळाले. हुडकेश्वर पोलिसांचे पथक परिसरात गस्त करीत होते. त्यांना होंडा स्टनर (एमएच ३१/ सीएक्स ५८०८) वर चार तरुण जाताना दिसले. त्यांचा पाठलाग केला असता काही अंतरावर पुन्हा दोन दुचाकीवर दिसले. त्यांना पोलिसांनी जेरबंद केले. त्यांची चौकशी केली असता लुटमार करणारे हेच ते असल्याचे स्पष्ट झाले. पुढच्या चौकशीत या टोळीने नंदनवन, हुडकेश्वर आणि हिंगणा भागातील गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडूनदोन चाकू, सात मोबाईल, अॅक्टीव्हा तसेच होंडा स्टनर दुचाकीसह ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.