आदर्श आचारसंहिता : नागपुरात ४५ होर्डिंग काढले; काही अजूनही कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 11:02 PM2019-03-11T23:02:43+5:302019-03-11T23:03:56+5:30
लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली. आदर्श आचारसंहितेसंदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी शहरातील महापालिकेच्या जागा किंवा मालकीच्या जाहिरात फलकांवर राजकीय बॅनर्स, होर्डिंग लागले असतील तर ते तातडीने काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार अधिकारी कामाला लागले. सोमवारी दिवसभरात शहराच्या विविध भागातील ४५ होर्डिंग व बॅनर काढण्यात आले. परंतु अजूनही शहरात ठिकठिकाणी राजकीय नेत्यांचे होर्डिंग व बॅनर झळकत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली. आदर्श आचारसंहितेसंदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी शहरातील महापालिकेच्या जागा किंवा मालकीच्या जाहिरात फलकांवर राजकीय बॅनर्स, होर्डिंग लागले असतील तर ते तातडीने काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार अधिकारी कामाला लागले. सोमवारी दिवसभरात शहराच्या विविध भागातील ४५ होर्डिंग व बॅनर काढण्यात आले. परंतु अजूनही शहरात ठिकठिकाणी राजकीय नेत्यांचे होर्डिंग व बॅनर झळकत आहेत.
शहरात जेथे-जेथे राजकीय व्यक्तींची नावे असलेली फलके आहेत, ते तातडीने काढण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले. त्यानुसार सोमवारी दिवसभर सर्व झोन क्षेत्रात कार्यवाही सुरू होती. परंतु अजूनही शहरातील पेट्रोल पंप, बसस्थानक, पूर्व व दक्षिण नागपुरातील काही चौक, मिनी बसेस यावर लावण्यात आलेले बॅनर व होर्डिंग सोमवारी सायंकाळपर्यंत कायम होते. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाचे होर्डिंग झळकत आहेत. काही ठिकाणी विकास कामांचे होर्डिंग अजूनही कायम असल्याचे निदर्शनास आले.
वास्तविक सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले होर्डिंग वा बॅनर ज्या राजकीय पक्षाच्या नेत्यांचे असेल त्यांनी वा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काढणे अपेक्षित आहे. मात्र यासाठी महापालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. झोन कार्यालयांना त्यांच्या क्षेत्रात लावण्यात आलेले होर्डिंग व बॅनर काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र यावर होणारा खर्च कोण देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.