मॉडेल मिल चाळवासीयांचा विरोध पडला अतिक्रमण पथकावर भारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 10:18 PM2019-07-09T22:18:44+5:302019-07-09T22:20:00+5:30
गणेशपेठच्या मॉडेल मिल चाळीतील जीर्ण झालेल्या इमारती तोडण्यासाठी मनपाचे पथक मंगळवारी दुपारी कारवाईसाठी पोहचले. मात्र चाळवासीयांनी दाखविलेल्या आक्रमकतेमुळे मनपाच्या अतिक्रमण पथकाला परत जावे लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणेशपेठच्या मॉडेल मिल चाळीतील जीर्ण झालेल्या इमारती तोडण्यासाठी मनपाचे पथक मंगळवारी दुपारी कारवाईसाठी पोहचले. मात्र चाळवासीयांनी दाखविलेल्या आक्रमकतेमुळे मनपाच्या अतिक्रमण पथकाला परत जावे लागले.
स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की, स्थानिक लोकांनी जमिनीवर घर मिळण्यासाठी न्यायालयीन लढाई लढली आहे. न्यायालयाने येथे निर्माण कार्य करणाऱ्या एजन्सीला प्रत्येक कुटुंबाला २२५ चौरस फुट घर उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला आता १६ वर्ष झाले आहे. संबंधित एजन्सीने अजून सुरुवातही केली नाही. महापालिका मात्र चाळीतील जीर्ण झालेल्या इमारतीमुळे नागरिकांना धोका होऊ नये म्हणून ते तोडण्याचा आग्रह करीत आहे. मात्र येथील रहिवाशांचे म्हणणे आहे की, जीर्ण झालेला भाग आम्ही स्वत:च तोडला आहे. आम्हाला आमच्या सुरक्षेची काळजी आहे. मंगळवारी कुठलीही नोटीस न देता मनपाचे अतिक्रमण पथक कारवाईसाठी येथे पोहचले. मात्र त्याला नागरिकांनी प्रचंड विरोध केला. पथकाला पोलीस बंदोबस्त सुद्धा मिळाला नव्हता. त्यामुळे हे पथक कारवाई न करता परत गेले.
चाळीत १७७ कुटुंबाचा निवास
मॉडेल मिल चाळीमध्ये १७७ कुटुंब राहतात. येथे राहणारे कुटुंबीय स्वत:चे घर मिळावे म्हणून अनेक वर्षापासून न्यायालयीन लढाई लढत आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही येथील लोकांना घर बांधून देण्यात आले नाही. त्यामुळे जीर्ण झालेल्या इमारतीत त्यांना राहण्याशिवाय पर्याय नाही.
चाळवासीयांनी स्वत:च तोडावी घरे
धंतोली झोनच्या सहा. आयुक्त स्मिता काळे म्हणाल्या की, मॉडेल मिल चाळीत २०१७ मध्ये घटना घडली होती. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. चाळवासीयांची पर्यायी निवास व्यवस्था होणे आवश्यक आहे. परंतु रहिवासी व बिल्डरमध्ये सामंजस्य झालेले नाही. चाळीतील इमारती अतिशय जीर्ण झालेल्या आहे. त्यामुळे रहिवाश्यांच्या जीवाला धोका आहे. नागरिकांच्या जीवाला धोका असल्यामुळे प्रशासनाची भूमिका अशा इमारती पाडण्यात येणे आवश्यक आहे. जर चाळवासी स्वत: इमारत तोडून नवीन घर बनवून राहण्यास तयार असले तर मनपाला कुठलीही आपत्ती नाही. मात्र तसे करीत नसतील तर आवश्यक पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतर कारवाई करण्यात येईल.