शिक्षणाच्या इस्लामीकरणासोबत आधुनिक अभ्यासक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:13 AM2021-08-18T04:13:25+5:302021-08-18T04:13:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अफगाणिस्तान काबीज केल्यानंतर तालिबानकडून जनतेच्या हितासाठी कार्य करण्याचे दावे करण्यात येत असून दोन दशकांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अफगाणिस्तान काबीज केल्यानंतर तालिबानकडून जनतेच्या हितासाठी कार्य करण्याचे दावे करण्यात येत असून दोन दशकांच्या मेहनतीतून रुळावर आलेल्या शिक्षण प्रणालीला लक्ष्य केले आहे. काबूलचा ताबा घेतल्यानंतर तालिबानच्या प्रतिनिधींनी कंधार विद्यापीठात विविध विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. विद्यापीठांमधील विद्यार्थी देशाच्या मूळ विचारसरणीचा मार्ग भटकले आहेत, अशी चिंता व्यक्त करत विद्यार्थ्यांमध्ये इस्लामिक विचार बिंबविण्यात यावे, असा फतवाच देत असताना तालिबान आधुनिक शिक्षणप्रणालीविरोधात असल्याचा ठपका मिटविण्यात यावा, असे निर्देशदेखील दिले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा निर्मितीसाठी तालिबानने अशी भूमिका घेतली असल्याची माहिती संबंधित विद्यापीठातील सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली आहे.
‘लोकमत’ने विविध विद्यापीठातील प्राध्यापकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यातून तालिबानच्या शिक्षणप्रणालीबाबतच्या भूमिकेसंदर्भातील बैठकीबाबत खुलासा झाला. अफगाणिस्तानच्या उच्च विभागाचे पदाधिकारी, कंदहार विद्यापीठाचे अधिष्ठाता व प्राध्यापक यांच्यासह संपूर्ण भागातील खासगी व सार्वजनिक विद्यापीठांच्या प्रतिनिधींना तालिबानने तातडीने हजर राहण्याचे निर्देश दिले होते. यावेळी उच्च शिक्षण विभागाचे सदस्य असलेले मौलवी अहमद शाह शाकीर यांनी अफगाणिस्तानच्या नव्या शासनकर्त्यांची भूमिका स्पष्ट केली. शिक्षणाचे संपूर्णपणे इस्लामीकरण करणे हा तालिबानचा अजेंडा असून, मदरसे, शाळा व विद्यापीठांमधील दरी कमी करण्यावर भर राहणार आहे, असे यावेळी स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय पातळीचे शिक्षण द्या
तालिबान आधुनिक शिक्षणाच्या विरोधात कधीही राहणार नाही. मागील २० वर्षे आमच्यावर हा आरोप होतो आहे, तो दूर करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यात यावे, असेदेखील तालिबानच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केल्याची माहिती कंधार विद्यापीठातील सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली. दरम्यान, स्वत:वरील ठप्पा मिटविण्याचा प्रयत्न करत असलेल्या तालिबानींनी विद्यार्थिनींच्या शिक्षणाबाबत भाष्य केलेले नाही व हा मुद्दा अनुत्तरितच आहे.
विद्यार्थी हतबल, शिक्षणाचे काय होणार?
कोरोनामुळे अफगाणिस्तानमधील विद्यापीठे बंद होती. आता परत संस्था सुरू होणार, असे चित्र असताना तालिबानने ताबा घेतला आहे. आता परत शिक्षणसंस्था सुरू होणार की नाही, परीक्षा होणार की नाही व आमची प्रगती होणार की नाही, असा सवाल विद्यार्थी उपस्थित करत आहेत.
अफगाणिस्तानमधील शिक्षण
-खासगी व सार्वजनिक मिळून ८५ हून अधिक विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्था
-पावणे दोन लाखांहून अधिक विद्यार्थी उच्च शिक्षणात
-विद्यार्थिनींचे प्रमाण २० टक्क्यांहून कमी
-विविध देशांच्या सहकार्याने विद्यार्थिनींसाठी ऑनलाईन अभ्यासक्रम
-कोरोनामुळे शिक्षणाला ब्रेक आणि आता तालिबानींचे संकट