हजारो अभियंत्यांना घडविणारे आधुनिक ‘द्रोणाचार्य’
By admin | Published: September 15, 2016 02:47 AM2016-09-15T02:47:30+5:302016-09-15T02:47:30+5:30
अभियांत्रिकी क्षेत्रात केवळ बुद्धिवंत असून चालत नाही, तर येथे यशासाठी कमालीची एकाग्रता, चिकाटी आणि स्वत:च्या कामावर निष्ठा लागते.
आज अभियंता दिन : ५० वर्षांपासून अथक संशोधन, अभियांत्रिकी संशोधनासाठी वेचले आयुष्य, ७५व्या वर्षी ‘डीएसस्सी’
योगेश पांडे नागपूर
अभियांत्रिकी क्षेत्रात केवळ बुद्धिवंत असून चालत नाही, तर येथे यशासाठी कमालीची एकाग्रता, चिकाटी आणि स्वत:च्या कामावर निष्ठा लागते. आजच्या ‘पॅकेज’च्या युगात फारसे अभियंता संशोधनाकडे वळत नाहीत. परंतु गेल्या ५० वर्षांपासून त्यांनी सातत्याने संशोधनाचाच ध्यास घेतला आहे. इतर सहकारी निवृत्त होऊन आरामशीर जीवन जगत असतान यांनी मात्र आपले जीवनच अभियांत्रिकी क्षेत्राला समर्पित केले आहे. स्वत:च्या उदाहरणातून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा दिली असून वयाच्या पंच्याहत्तरीतदेखील त्यांच्यातील संशोधकाचा उत्साह कुणाही तरुणाला लाजवेल असाच आहे. अभियांत्रिकी जगतातील या आधुनिक द्रोणाचार्यांचे नाव डॉ. जयंत पी. मोडक असे असून त्यांच्या संशोधनाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानेदेखील ‘डीएसस्सी’ ही संशोधनातील सर्वोच्च पदवी देऊन सलामच केला आहे.
मूळचे सूरत येथील असलेले जयंत मोडक यांचा जन्म सूरत येथे झाला व तेथील ‘एनआयटी’मधून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. सुरुवातीपासूनच त्यांचा यांत्रिक अभियांत्रिकीकडे कल होता व याच क्षेत्रात संशोधन करायची ही त्यांनी मनाशी खूणगाठ बांधली होती. १९६७ साली ते ‘व्हीआरसीई’ (आत्ताचे ‘व्हीएनआयटी’) येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. ‘व्हीआरसीई’मध्ये असताना त्यांनी अध्यापनासोबतच स्वत:ला संशोधनात अक्षरश: झोकून दिले होते. १९७९ मध्ये ‘व्हीएनआयटी’ला ‘म्हाडा’कडून एक ‘प्रोजेक्ट’ मिळाला. कुठलेही इंधन न वापरता मनुष्यबळाला सहजपणे ‘फ्लायअॅश’पासून विटा तयार करता येईल, अशी यंत्रणा तयार करण्याचे त्यांच्यासमोर आव्हान होते. डॉ. मोडक यांनी ते आव्हान स्वीकारले व चुना, फ्लायअॅश, रेती यांच्यापासून सहजपणे विटा तयार होतील, असे यंत्र तयार केले. या यंत्रात ‘फ्लायव्हील’चा वापर केला होता. या कालावधीत त्यांनी ‘मास्टर्स आॅफ इंजिनिअरिंग’ (संशोधनातून) तसेच ‘पीएचडी’ पूर्ण केले.
विटांच्या निर्मितीसाठी वापरलेली यंत्रणा आदिवासी, ग्रामीण भागातील नागरिक तसेच शेतकरी यांच्या कामात येऊ शकते, या विचारातून त्यांनी आपले संशोधन पुढे नेले. पुढील ३७ वर्षांच्या संशोधनात त्यांनी सहजपणे अवघड यांत्रिक कामे होऊ शकतील, असे १५ हून अधिक यशस्वी प्रयोग केले. यामुळे हजारो ग्रामीण लोकांच्या उद्योगप्रक्रियेला गती मिळाली. याच विविध संशोधनावर आधारित ‘ह्युमन पॉवर्ड फ्लायव्हील मोटर्स' कन्सेप्ट, डिझाईन डायनामिक अॅन्ड अप्लीकेशन्स' या विषयावर त्यांनी ‘डीएसस्सी’चा प्रबंध लिहिला व तो नागपूर विद्यापीठाला सादर केला.
संशोधनासोबत दर्जेदार अध्यापन
डॉ.जयंत मोडक यांनी संशोधनासोबतच दर्जेदार अध्यापनावरदेखील भर दिला होता. त्यामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये प्रसिद्ध होते. त्यांच्याकडून कळत-नकळत मार्गदर्शन घेतलेले हजारो विद्यार्थी आज देशविदेशात मोठमोठ्या पदांवर आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ७० विद्यार्थ्यांनी ‘पीएचडी’ केली आहे व आजवर त्यांच्या स्वत:च्या ६०० हून अधिक शोधपत्रिका प्रकाशित झाल्या आहेत. डॉ. मोडक हे सध्या प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आरअॅन्डडी’ (रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेन्ट) विभागाचे प्रमुख असून या वयातदेखील ते सातत्याने सक्रिय आहेत.
‘एमआयटी’तील परीक्षकदेखील अचंबित
डॉ.जयंत मोडक यांच्या ‘डीएसस्सी’च्या प्रबंधाचे परीक्षण जागतिक दर्जाच्या परीक्षकांनी केले. यातील एक परीक्षक अमेरिकेतील ‘एमआयटी’ (मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) या जगातील नामांकित अभियांत्रिकी संस्थेतील संशोधक होते. ७५ वर्षांच्या वयात मोडक यांची सक्रियता व कामाचा दर्जा पाहून तेदेखील अचंबित झाले. नागपूर विद्यापीठाच्या १०३ व्या दीक्षांत समारंभात त्यांना ‘डीएसस्सी’ पदवी प्रदान करण्यात येणार आहे. संशोधन आणि अभियांत्रिकी हा माझा जीव की प्राण आहे. अनेकदा अडथळे आले. परंतु मी चिकाटी सोडली नाही. या क्षेत्रात राज्यात आतापर्यंत कुणालाही ‘डीएसस्सी’ मिळाली नव्हती. राष्ट्रीय पातळीवरदेखील माझा पहिल्या दहामध्ये क्रमांक लागतो, असे डॉ.जयंत मोडक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. माझी पत्नी सुहासिनी मोडक, मुलगा डॉ. अमित मोडक, सून डॉ. मेघना मोडक, मुलगी प्रा. सारिका आणि नात साक्षी यांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिले, असेदेखील ते म्हणाले.