आधुनिक लोकरंजनवाद लोकशाहीसाठी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 10:27 AM2019-05-21T10:27:51+5:302019-05-21T10:31:37+5:30

लोकहिताचा विचार न करता लोकरंजनाची धोरणे राबविण्याची प्रवृत्ती जगभरात झपाट्याने वाढत आहे. हा लोकरंजनवाद लोकशाही व संविधानिक मूल्यांसाठी धोकादायक सिद्ध होत आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे नागपूरकर न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी व्यक्त केले.

Modern method of pleasing people is dangerous for democracy | आधुनिक लोकरंजनवाद लोकशाहीसाठी धोकादायक

आधुनिक लोकरंजनवाद लोकशाहीसाठी धोकादायक

Next
ठळक मुद्देन्या. शरद बोबडे यांचे मतरशियातील आंतरराष्ट्रीय परिषदेत मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकहिताचा विचार न करता लोकरंजनाची धोरणे राबविण्याची प्रवृत्ती जगभरात झपाट्याने वाढत आहे. हा लोकरंजनवाद लोकशाही व संविधानिक मूल्यांसाठी धोकादायक सिद्ध होत आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे नागपूरकर न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी व्यक्त केले.
रशियातील पीटर्सबर्ग येथे नुकतीच ‘संविधानिक ओळख व वैश्विक मूल्ये’ विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद झाली. न्या. बोबडे त्या परिषदेत सहभागी झाले होते. ते परिषदेतील द्वितीय सत्राचे अध्यक्ष होते. ‘न्यायव्यवस्था व आधुनिक लोकरंजनवाद : आव्हाने व संभावना’ हा त्या सत्राचा विषय होता. न्या. बोबडे यांनी भारतीय व पाश्चिमात्य न्यायिक अनुभवाच्या आधारे या विषयावर विस्तृत मार्गदर्शन करताना हे मत व्यक्त केले. रशियातील संविधानिक न्यायालयाचे अध्यक्ष व्हॅलेरी झोरकीन व सर्वोच्च न्यायालयाचे उपाध्यक्ष पीटर सेरकोव्ह व्यासपीठावर उपस्थित होते.
राज्यकर्त्यांनी लोकरंजनापेक्षा लोकहिताचा विचार करणे आवश्यक आहे. परंतु, अलीकडे लोकरंजनाला अधिक महत्त्व आले आहे. हा लोकरंजनवाद संपूर्ण जगाची समस्या झाला आहे. सर्वत्र राष्ट्रीयता, संस्कृती व परंपरेच्या नावाखाली लोकरंजनवाद राबवला जात आहे. त्याने सर्वसमावेशकता, समानता, धर्मनिरपेक्षता अशा वैश्विक संविधानिक मूल्यांना धोका निर्माण केला आहे. न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य व कायदेशीर अधिकारांनाही आव्हान दिले आहे. लोकरंजनवादाची चळवळ लोकशाहीची घडी विस्कळीत करीत आहे, असे न्या. बोबडे यांनी सांगितले.
लोकांना खूश करून राजकीय लाभ मिळविणे हा लोकरंजनवाद होय. त्याअंतर्गत मनमानी पद्धतीने धोरणे राबविले जातात. त्याकरिता लोकशाहीचा गळा दाबणे, न्यायव्यवस्थेवर दबाव निर्माण करणे अशा नाना पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यामुळे न्यायव्यवस्थेने आवश्यक तेव्हा आपल्या अधिकारांचा वापर करून लोकरंजनवादावर नियंत्रण ठेवण्याचे जोरकस प्रयत्न केले पाहिजे. जगाच्या कल्याणाकरिता संविधानिक मूल्ये टिकायला हवीत, असेही न्या. बोबडे यांनी यावेळी नमूद केले. याप्रसंगी उपस्थित विविध देशांच्या प्रतिनिधींना त्यांच्या मार्गदर्शनाने प्रभावित केले.

Web Title: Modern method of pleasing people is dangerous for democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.