मॉडर्न स्कूल, स्कूल ऑफ स्कॉलर्स व सांदीपनी महापौर चषकाचे मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 23:59 IST2019-08-14T23:57:07+5:302019-08-14T23:59:48+5:30
महापालिकेच्या क्रीडा, शिक्षण व सांस्कृतिक विभागाच्यावतीने आयोजित महापौर चषक वंदेमातरम् समूहगान स्पर्धेच्या अंतिम फेरीत मॉडर्न स्कूल कोराडी रोड, स्कूल ऑफ स्कॉलर्स अत्रे ले-आऊट व सांदीपनी स्कूल हजारीपहाड या शाळांचे संघ महापौर चषकाचे मानकरी ठरले.

मॉडर्न स्कूल, स्कूल ऑफ स्कॉलर्स व सांदीपनी महापौर चषकाचे मानकरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या क्रीडा, शिक्षण व सांस्कृतिक विभागाच्यावतीने आयोजित महापौर चषक वंदेमातरम् समूहगान स्पर्धेच्या अंतिम फेरीत मॉडर्न स्कूल कोराडी रोड, स्कूल ऑफ स्कॉलर्स अत्रे ले-आऊट व सांदीपनी स्कूल हजारीपहाड या शाळांचे संघ महापौर चषकाचे मानकरी ठरले. त्यांनी अनुक्रमे पहिल्या गटात इयत्ता ९ वी ते १० वी, दुसऱ्या गटात इयत्ता ६वी ते ८ वी व तिसऱ्या गटात इयत्ता १ ली ते ५ पाचवी या गटातून प्रथम क्रमांक पटकावला. तिन्ही गटातील विजेत्या संघाला शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले, शिक्षण समिती उपसभापती प्रमोद तभाने, आरोग्य समिती उपसभापती नागेश सहारे व अन्य मान्यवरांच्या हस्ते महापौर चषक, १० हजार रुपये रोख बक्षीस प्रदान करण्यात आले.
बुधवारी सिव्हील लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. तिन्ही गटातील विजेत्या, उपविजेत्या,तृतीय क्रमांक प्राप्त संघांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. पुरस्कार वितरण समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून दिलीप दिवे उपस्थित होते. तत्पूर्वी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या हस्ते स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उद्घाटन झाले. अंतिम फेरीत ९वी ते १०वी या भवन्स बी.पी. विद्या मंदिर संघ उपविजेता ठरला. नागपूर महापालिकेच्या बॅरिस्टर शेषराव वानखेडे विद्यानिकेतन संघाने तिसरा क्रमांक पटकावला तर बी.आर.एस. मुंडले साऊथ अंबाझरी शाळेला प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.
६ वी ते ८ वी गटामध्ये साऊथ पॉईंट स्कूल ओंकार नगर संघाने उपविजेतेपद,भारतीय विद्या भवन्स त्रिमूर्ती नगर संघाने तिसरे स्थान प्राप्त केले. प्रोत्साहन बक्षीस मनपाच्या दुर्गा नगर माध्यमिक शाळा संघाला मिळाले,
१ली ते ५ वी या गटात स्कूल ऑफ स्कॉलर्स बेलतरोडी संघ उपविजेता तर भारतीय विद्या भवन्स श्रीकृष्ण नगर संघाने तृतीय क्रमांक मिळविला. मनपाच्या विवेकानंद हिंदी प्राथमिक शाळेला प्रोत्साहन पुरस्कार मिळाला. उपविजेत्या संघाला चषक, सात हजार तर तृतीय क्रमांकाला पाच हजार रुपये रोख व भेटवस्तू देण्यात आल्या. प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून तीन हजार व चषक व भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी परीक्षकांचाही सत्कार केला.