नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 09:06 PM2017-12-08T21:06:31+5:302017-12-08T21:11:33+5:30
हिवाळी अधिवेशनादरम्यान सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यावर्षी पोलीस बंदोबस्त केला जाणार आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : हिवाळी अधिवेशनादरम्यान सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यावर्षी पोलीस बंदोबस्त केला जाणार आहे. त्यासाठी अत्यंत सूक्ष्म अभ्यास आणि नियोजन करण्यात आले आहे. म्हणूनच दरवर्षीच्या तुलनेत यंदा हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तात कमी मनुष्यबळाचा वापर करून चांगली सुरक्षा व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकारांना दिली. अधिवेशनाची सुरक्षा व्यवस्था (बंदोबस्त) कसा राहणार, त्यासंबंधाने पोलीस आयुक्तालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात आयुक्त बोलत होते. यावेळी सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे आणि उपायुक्त (प्रशासन) सुहास बावचे उपस्थित होते.
आयुक्तांनी यावर्षी हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तात पोलिसांचे संख्याबळ किती, अन्य उपाययोजना कोणत्या त्याची माहिती पत्रकारांना दिली. अधिवेशन काळात विधानभवन, रविभवन, नागभवन, आमदार निवासासह महत्त्वाच्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सर्वच निवासस्थानी २४ तास विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. अधिवेशन काळात सरकार मुक्कामी असल्यामुळे पोलिसांची जबाबदारी वाढते. मात्र, त्यात कसलीही हयगय केली जाणार नाही. सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था उत्तम राहील, याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाणार आहे. कायदा तोडण्याचा अथवा हातात घेण्याचा प्रयत्न करणारांवर कडक कारवाई केली जाईल. अनेकदा मोर्चेकरी कायदा हातात घेतात, असा प्रयत्न झाल्यास पोलीस कायदेशीरपणे बळाचा वापर करतील, असा इशाराही त्यांनी दिला.
संख्याबळापेक्षा तंत्रज्ञानाला महत्त्व
दरवर्षी हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात राज्यातील विविध ठिकाणांहून ४ ते ५ हजार पोलीस (अधिकारी-कर्मचारी) बोलवून घेतले जातात. नागपुरातील पोलिसांची संख्याही तेवढीच असते. यावर्षी मात्र एकूण ५,८०० पोलीस अधिकारी-कर्मचारीच बंदोबस्तात राहणार आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी मनुष्यबळात उत्तम बंदोबस्त करण्याची पोलिसांची योजना आहे. त्यासाठी ड्रोन, सीसीटीव्ही आणि हेल्मेट तसेच बॉडी कॅमेरे, बॅग स्कॅनर यांचा प्रभावीपणे वापर केला जाणार आहे. त्यासाठी नासुप्र कार्यालयात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत लागलेल्या सीसीटीव्हीच्या कंट्रोल रूमजवळच पोलीस आपली स्वतंत्र यंत्रणा उभारून शहरातील प्रत्येक घडामोडीवर, संशयितांवर नजर ठेवणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
२२६ सीसीटीव्ही (स्मार्ट सिटीचे वेगळे)
दोन ड्रोन, शंभरावर व्हिडीओ कॅमेरे
बाहेरून २७३० पोलीस येणार
त्यात ४३० अधिकारी (पोलीस उपनिरीक्षक ते अधीक्षक)
बाहेरचे १५ तर शहरातील १२ उपायुक्त
१४०० होमगार्ड
८ एसआरपीएफ कंपनी, एक फोर्स वन कंपनी
शहरातील २ हजार पोलीस
२० बॉम्बशोधक आणि नाशक पथके
एकूण मनुष्यबळ ५८००, ३ अॅम्बुलन्स, अग्निशमन दलाचे बंब, वज्र आणि वरुणही राहणार सज्ज
मोर्चा पॉर्इंट
विविध पक्ष आणि संघटनांच्या मोर्चांसाठी पाच पॉर्इंट ठरवून देण्यात आले आहेत. टेकडी मार्ग, मॉरिस कॉलेज टी पॉर्इंट, श्री मोहिनी कॉम्प्लेक्स, एलआयसी चौक आणि लिबर्टी चौक, असे हे पॉर्इंट आहेत. या ठिकाणांवर बाहेरून अलेल्या पोलिसांना बंदोबस्तासाठी ठेवले जाईल. धरणे, उपोषणकर्त्यांसाठी पटवर्धन ग्राऊंडमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. तेथील जागा साफ करण्यात आली असून, आवश्यक त्या सुविधा तेथे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
मेट्रो, सिमेंट रोडचे आव्हान
मेट्रो आणि सिमेंट रस्त्याच्या कामांमुळे थोडा त्रास सहन करावा लागू शकतो. मोर्चेकऱ्यांना हाताळण्यासाठी पोलिसांवरही ताण पडणार आहे. ते एक प्रकारचे आव्हान आहे. मात्र, सर्व व्यवस्थितपणे पार पाडले जाईल. त्यासाठी मेट्रो आणि रस्ता बांधकाम करणाऱ्या वरिष्ठांसोबत आपण चर्चा केली असून, त्यांनी अधिवेशनाच्या कालावधीत दिवसा काम बंद ठेवण्याचे मान्य केले आहे. तरीसुद्धा मोर्चाच्या वेळी वाहतूक रखडण्याचा धोका आहे. त्यासाठी पोलीस उपाययोजना करीत आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महामोर्चादरम्यान वाहतूक व्यवस्थेचे तसेच बंदोबस्ताचे वेगळे नियोजन करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
सभापती व अध्यक्ष रविवारी घेणार तयारीचा आढावा
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे हिवाळी अधिवेशनासाठी ९ डिसेंबर रोजी विमानाने मुंबई येथून रात्री ८.३० वाजता आगमन होत आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे १० डिसेंबर रोजी मुंबई येथून विमानाने सकाळी ९.५० वाजता येथे येणार आहेत.
विधानभवन येथे रविवारी सकाळी ११.३० वाजता हिवाळी अधिवेशन २०१७ च्या अनुषंगाने विधिमंडळ अधिवेशनासंदर्भात करावयाच्या व्यवस्थेसंदर्भात तसेच सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि सभापती रामराजे नाईक आढावा घेतील.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा ९ डिसेंबर रोजी रात्री येणार आहेत. यासोबतच कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर आणि मुख्य सचिव सुमित मल्लिक हेसुद्धा ९ डिसेंबर रोजी येणार आहेत.