गोहत्या करणा-यांना मोदीही वाचवू शकत नाहीत!- तोगडिया

By admin | Published: October 24, 2015 11:09 AM2015-10-24T11:09:02+5:302015-10-24T11:17:21+5:30

गोहत्या करणार्‍यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील वाचवू शकत नाहीत, अशी धमकी विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी दिली आहे.

Modi can not save cow slaughter: Togadia | गोहत्या करणा-यांना मोदीही वाचवू शकत नाहीत!- तोगडिया

गोहत्या करणा-यांना मोदीही वाचवू शकत नाहीत!- तोगडिया

Next

 नागपूर: वादग्रस्त वक्तव्यांमुळे देशातील वातावरण तापले असतानाच 'गोहत्या करणार्‍यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील वाचवू शकत नाहीत,' अशी इशारावजा धमकी देऊन विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे.
गोहत्या करून कुणीही भारतात राहू शकत नाही. गोहत्या करणार्‍यांनी या भ्रमात राहू नये की समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंह यादव, मुख्यमंत्री अखिलेशसिंह यादव किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना वाचवतील, असे वक्तव्य तोगडिया यांनी शुक्रवारी केले. नागपूरहून दिल्ली येथे परतताना ते पत्रकारांशी बोलत होते. दादरी येथे घडलेली घटना व गोवंश हत्येवर त्यांनी आक्रमक भूमिका मांडली.
तोगडिया म्हणाले, मुस्लिमांनी हिंदूंच्या भावनांचा आदर करावा व गोहत्या बंदीच्या आदेशाचे पालन करावे. जर कुणी या आदेशाचे पालन न करता हिंदूंच्या भावनांचा अपमान करण्याचा प्रयत्न करेल तर त्याला उत्तर दिले जाईल. मग हे उत्तर कुणाचे शांत पद्धतीने असेल तर कुणाचे हिंसक असेल. ते उत्तर देणार्‍यावर अवलंबून असेल. मात्र, अशा प्रकरणांची प्रतिक्रिया उमटेलच एवढे नक्की, असा थेट इशाराही त्यांनी दिला. राममंदिर निश्‍चितच उभारले जाईल, असा दावा करीत तोगडिया म्हणाले, जसे सोमनाथ मंदिर उभारताना सरदार पटेल यांनी कुणाचीही सहमती घेतली नव्हती. न्यायालयाकडे विचारणाही केली नव्हती; देशाच्या कॅबिनेटने निर्णय घेतला होता. आता राम मंदिरासाठी देशाच्या संसदेत कायदा तयार व्हावा. तोच राम मंदिर उभारण्याचा एकमेव मार्ग आहे. भाजपाकडे संसदेत बहुमत आहे. त्यामुळे भाजपाने कायदा बनवून राममंदिर उभारायला हवे, असेही तोगडिया म्हणाले.
 

Web Title: Modi can not save cow slaughter: Togadia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.