मोदी करणार दीक्षाभूमीवर ध्यान साधना
By admin | Published: April 14, 2017 02:58 AM2017-04-14T02:58:19+5:302017-04-14T02:58:19+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर दौऱ्यावर येत आहेत.
तब्बल साडेतीन तास नागपुरात : भरगच्च कार्यक्रम
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर दौऱ्यावर येत आहेत. तब्बल साडेतीन तास ते नागपुरात राहतील. यावेळी ते दीक्षाभूमीला भेट देऊन ध्यान साधना करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सकाळी १०.४५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होईल. विमानतळावर राज्यपाल सी. विद्यासागर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे स्वागत करतील. विमानतळावरून पंतप्रधान थेट दीक्षाभूमीसाठी रवाना होतील. सकाळी ११ वाजता दीक्षाभूमीला भेट देतील. दीक्षाभूमीवर ते जवळपास २० मिनिटे घालवतील. यावेळी सर्वप्रथम ते दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर मध्यवर्ती स्मारकात जातील. स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिकलश आणि तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेला अभिवादन करतील.
मध्यवर्ती स्मारकामध्येच ते सुमारे पाच मिनिटे ध्यान साधना करणार आहेत. पंतप्रधानांच्या ध्यान साधनेसाठी स्मारक समितीच्यावतीने स्मारकामध्ये विशेष बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. यानंतर स्मारकातील वरच्या ‘डोम’वरून पंतप्रधान दीक्षाभूमी परिसराची पाहणी करतील. यानंतर दीक्षाभूमीच्या व्हीजिट बुकमध्ये ते आपला अभिप्राय लिहितील. (प्रतिनिधी)
दीक्षाभूमी स्मारक समितीतर्फे स्वागत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष स्वागत केले जाईल. स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आणि दीक्षाभूमीची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिले जाईल. यावेळी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, डॉ. सुधीर फुलझेले, डॉ. राजेंद्र गवई, विजय चिकाटे, एन.आर. सुटे आदी प्रामुख्याने उपस्थित राहतील.
दीक्षाभूमीवरील टपाल तिकिटाचे लोकार्पण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी ऐतिहासिक धम्म व सामाजिक क्रांती घडवून आणली, ती दीक्षाभूमी आज जगभरातील शोषितांची प्रेरणा भूमी बनली आहे. ही ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता दीक्षाभूमीवर टपाल तिकीट काढण्यात यावे, अशी आंबेडकरी अनुयायांची मागणी होती. सरकारने ही मागणी पूर्ण केली आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी’ या टपाल तिकिटाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मानकापूर येथील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.