देशवासीयांनी पाहिलेले स्वप्न मोदी सरकार पूर्ण करीत आहे; सौभाग्य योजनेचे राज्यस्तरीय उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 08:21 PM2017-12-23T20:21:38+5:302017-12-23T20:24:49+5:30
मोदी सरकारने मात्र पुन्हा त्या स्वप्नाकडे आपले लक्ष वळविले असून एकेक स्वप्न पूर्ण केले जात आहे. विकास आणि सोईसुविधा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवल्या जात असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : स्वातंत्र्यापूर्वी या देशातील लोकांनी जी स्वप्ने पाहिली होती, ती पूर्ण झाली नाहीत. राजकीय उलथापालथीमुळे ती स्वप्न विसरली गेली. पण तीन वर्षांपूर्वी केंद्र्रात सत्तेत आलेल्या मोदी सरकारने मात्र पुन्हा त्या स्वप्नाकडे आपले लक्ष वळविले असून एकेक स्वप्न पूर्ण केले जात आहे. विकास आणि सोईसुविधा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवल्या जात असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या सहज बिजली हर घर योजना या सौभाग्य योजनेच्या महाराष्ट्रातील शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आर.के. सिंह, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, राज्याचे ऊजामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, खा. विकास महात्मे, आ. सुधाकर देशमुख, राज्याचे ऊर्जा सचिव अरविंद सिंह, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार, महाऊर्जाचे महासंचालक राजाराम माने, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक राजीव मित्तल, महानिर्मितीचे बिपीन श्रीमाळी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, स्वच्छ भारत योजनेत तीन वर्षात राज्याने ५० लाख शौचालये बांधून दिली. उज्ज्वला योजनेत १३ कोटी गरीब परिवारांना नि:शुल्क सिलेंडर दिले. उजाला योजनेत ज्या गावांमध्ये वीज गेली नाही अशा गावांना वीज दिली आणि आता सौभाग्य योजनेत ज्या घरांना वीज मिळाली नाही, त्या घरांना वीज दिली जाणार आहे. नितीन गडकरी यांनी राज्यात रस्त्यांचे जाळे विणले आहे. ३ वर्षात ९० हजार किलोमीटरने रस्त्याचे जाळे वाढले आहे. घरकुल योजनेत १२ लाख बेघर परिवारांना २०१९ पर्यंत स्वत:ची घरे देण्याचे लक्ष्य आहे.
यावेळी सौभाग्य योजनेंतर्गत चंद्रपूर व गडचिरोलीसारख्या आदिवासी गावांमध्ये राहणाऱ्या करणू सिडाम, आयुष सिडाम, अणू हलुमिंच आदींसह पाच लाभार्थ्यांना वीज जोडणीचे प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महावितरणच्या जागेवर सुरू करण्यात आलेल्या चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल इंडिया अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.
ऊर्जा सचिव अरविद सिंग यांनी प्रास्ताविक केले. संचालन डॉ. स्मिता माहूरकर यांनी केले. राजाराम माने यांनी आभार मानले.
वीज हेच भविष्य - नितीन गडकरी
वीज हेच भविष्य आहे. तेव्हा गरिबांच्या जीवनातील हा ऐतिहासिक क्षण असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
२४ बाय ७ पाणीपुरवठा योजना, सांडपाणी शुध्द करून ऊर्जानिर्मितीसाठी वापर या प्रकल्पांकडे लक्ष वेधले. २०० वाहने आज विजेवर चालत आहेत. महिनाभरात हजार वाहने नागपुरात विजेवर चालणार आहेत. पार्किगच्या ठिकाणी इलक्ट्रीक वाहने चार्जिंग पॉईंट करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. मिथेनॉल, इथेनॉल, सीएनजी, इलेक्ट्रिक चार्जिंग केंद्र यातून आपल्याला प्रदूषणमुक्त शहरे बनविता येतील असेही गडकरी म्हणाले.
देश विजेच्या निर्मितीत स्वयंपूर्ण - आर. के. सिंग
अपारंपरिक ऊर्जेचे भविष्य पुढे चांगले आहे. औष्णिक ऊर्जेला सौर ऊर्जा मागे टाकणार आहे. तसेच सोलरपासून मिळणार असलेली ऊर्जा आता स्वस्त दरात उपलब्ध होत आहे. सौर ऊर्जाच प्रमुख ऊर्जा ठरणार आहे. वाहनांसोबतच आता घरात स्वयंपाकासाठीही विजेचा वापर भविष्यात वाढणार आहे. २०२२ पर्यंत हा देश १.७५ लाख मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण करणारा देश राहणार असून असल्याचेही केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आर. के. सिंग यांनी सांगितले.
हा देश आता विजेच्या निर्मितीत स्वयंपूर्ण आहे. ३ लाख २१ हजार मेगवॉट वीज आपण देत आहोत. यात आणखी १.७५ लाख मेगावॉटची भर शासन घालणार असून २०२२ पर्यंत १ लाख ७५ हजार मेगावॉट सौर ऊर्जा हा देश निर्माण करणार आहे. गंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या सर्व औष्णिक वीज केंद्रांना सांडपाणी शुध्दीकरण करून ते वापरणे बंधनकारक करणार आहोत. असेही त्यांनी स्पष्ट केले.
२०१८ पर्यंत सर्व घरांना वीज - बावनकुळे
सौभाग्य योजनेंतर्गत २०१८ पर्यंत सर्व घरांना वीज कनेक्शन देण्यात येईल. डिसेंबरपर्यंत एकही घर वीज नसलेले राहणार नाही, अशी ग्वाही ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. विजेच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहे. ३० ते ४० वर्षाचे प्लांट बंद केल्या जाणार आहेत. पुढच्या महिन्यात भुसावळ येथे ६६० मेगावॉट प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहोत. ३ महिन्यात १६०० मेगावॉटचे नवीन केंद्र आणत आहोत. एकीकडे नवीन वीज केंद्र आणि दुसºया बाजूला १४,४०० मेगावॉट सौर ऊर्जा निर्मिती करण्याचे ऊर्जा विभागाने निश्चित केले आहे.