मोदी सरकारने देशाला दिशा दिली
By admin | Published: May 27, 2016 02:44 AM2016-05-27T02:44:52+5:302016-05-27T02:44:52+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील भाजप सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात विकासाच्या विविध योजना राबविल्या.
निहाल चंद मेघवाल : दोन वर्षांच्या यशस्वी वाटचालीचे अभिनंदन
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील भाजप सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात विकासाच्या विविध योजना राबविल्या. देशाला विकासाची नवी दिशा दिल्याचा दावा केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री निहाल चंद मेघवाल यांनी गुरुवारी केला.
केंद्र सरकारच्या दोन वर्षांच्या यशस्वी वाटचालीनिमित्त भाजपतर्फे शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित अभिनंदन सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, भाजपचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, अनिल सोले, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, गिरीश व्यास, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर आदी उपस्थित होेते.
जनधन योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांची बँकेत खाते उघडून ३६ हजार कोटी जमा केले. नरेगाच्या माध्यमातून गरीब लोकांना ४६ हजार कोटींचा लाभ झाला. प्रधानमंत्री कोष योजना, प्रधानमंत्री विमा योजना, गरिबांना स्वयंपाकाचा गॅस अशा योजना हाती घेतल्या. ग्रामपंचायतींना दोन लाख कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला. काँग्रेसच्या ६० वर्षांच्या राजवटीला भाजपचे पाच वर्षांचे सरकार भारी पडेल. मोदी १० वर्षे पंतप्रधानपदी राहिले तर या देशाला गतवैभव प्राप्त होईल. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर शहराच्या विकासासाठी १८ हजार कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती मेघवाल यांनी दिली.
नरेंद्र मोदी व नितीन गडकरी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांत देशाला प्रगतिपथावर नेले. कामकाजाच्या प्रगतीचा लेखाजोखा जनतेपुढे मांडणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत. गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नागपूर शहरात विकासाची गंगा आल्याचे सुधाकर कोहळे यांनी प्रास्ताविकातून सांगितले.
व्यासपीठावर उपमहापौर सतीश होले, माजी महापौर अर्चना डेहनकर, माया इवनाते, जि.प.चे शिक्षण सभापती उकेश चव्हाण आदी उपस्थित होते. संचालन संदीप जाधव यांनी तर आभार भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी मानले.(प्रतिनिधी)
काँग्रेसचे आरोप निराधार
मोदी सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात विकासाच्या विविध योजना राबविल्या. ग्रामपंचायतींना प्रत्येकी ५० ते ८० लाखांचा निधी उपलब्ध केला. सिंचन व पाणीपुरठ्याच्या योजनांना प्राधान्य दिले. पाच वर्षांनंतर देशाचा विकास झालेला दिसेल. त्यामुळे काँग्रेसने मोदी सरकारवर केलेले आरोप निराधार असल्याचे निहाल चंद मेघवाल यांनी पत्रकारांशी चर्चा करताना सांगितले.