मोदी सरकारच्या योजना चक्क रद्दीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 01:40 AM2018-08-02T01:40:06+5:302018-08-02T01:41:09+5:30
आगामी निवडणुका लक्षात घेता भाजपाकडून मागील वर्षीपासूनच तयारी सुरू झाली आहे. जनसंपर्क मोहिमेच्या माध्यमातून जनतेपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात केंद्र व राज्य शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी भर देण्यात येत असल्याचा दावादेखील नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात दिव्याखालीच अंधार असून विविध मंत्रालयांची कामे व योजनांची माहिती देणारे साहित्य चक्क भाजप कार्यालयाच्या परिसरातच अक्षरश: रद्दीतील कचऱ्याप्रमाणे पडले असल्याचे चित्र आहे. पक्ष नेत्यांच्या येण्याजाण्याच्या मार्गावर हे साहित्य असतानादेखील त्याची कुणीही योग्य दखल घेतलेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आगामी निवडणुका लक्षात घेता भाजपाकडून मागील वर्षीपासूनच तयारी सुरू झाली आहे. जनसंपर्क मोहिमेच्या माध्यमातून जनतेपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात केंद्र व राज्य शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी भर देण्यात येत असल्याचा दावादेखील नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात दिव्याखालीच अंधार असून विविध मंत्रालयांची कामे व योजनांची माहिती देणारे साहित्य चक्क भाजप कार्यालयाच्या परिसरातच अक्षरश: रद्दीतील कचऱ्याप्रमाणे पडले असल्याचे चित्र आहे. पक्ष नेत्यांच्या येण्याजाण्याच्या मार्गावर हे साहित्य असतानादेखील त्याची कुणीही योग्य दखल घेतलेली नाही.
आता केंद्र व राज्य शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘संपर्कातून समर्थन’ ही मोहीम राबविण्यात येत आहेत. यादरम्यान नवीन मतदारांपर्यंत ही माहिती पोहचविण्यावर जास्त भर देण्यात येत आहे. मतदारांना योजना कळाव्यात यासाठी क्षेत्रीय व केंद्रीय पातळीवरून आलेल्या निर्देशांनुसार मोठ्या प्रमाणात प्रचार साहित्य छापण्यात आले आहे. यात लहान पुस्तिका, पत्रके इत्यादींचा समावेश आहे. जवळपास प्रत्येकच साहित्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्रदेखील आहे.
गणेशपेठ येथील भाजपा कार्यालयात हे साहित्य उपलब्ध आहे. परंतु यातील काही साहित्य चक्क कार्यालयाच्या इमारतीमधील तळमजल्यावर ‘लिफ्ट’जवळ भंगारासारखे ठेवण्यात आले आहे. यातील बरेचसे साहित्य पाण्यामुळे खराबदेखील झाले असून पत्रके विखुरलेली आहेत. यात अगदी मंत्रालयनिहाय पुस्तिकांचादेखील समावेश आहे. विशेष म्हणजे कार्यालयात जाण्यासाठी हाच मार्ग असून पक्षाचे पदाधिकारी, नेते यांच्यापैकी कुणीही यांना हटविण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी भाजपचे शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
कार्यकर्त्यांनी व्यक्त केली नाराजी
पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची नेहमीच उठबस असते. यातील काही सूज्ञ कार्यकर्त्यांनी पदाधिकाºयांच्या कानावर ही बाब टाकलीदेखील. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. महाल परिसरातील अनेक खाद्यपदार्थांच्या ठेल्यावर, पानटपऱ्यांवरदेखील येथील पत्रकांचा वापर करण्यात येत असल्याची माहिती भाजपच्याच एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने ‘लोकमत’ला दिली. आम्ही पक्षासाठी दिवसरात्र एक करतो आणि आमच्या सरकारची माहिती देणाऱ्या साहित्याची कदरदेखील पदाधिकाऱ्यांना नसल्याचे पाहून दु:ख होते, अशी भावना काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.