मोदी यांची ‘बॅक डोअर डिप्लोमसी फेल्युअर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2016 03:05 AM2016-02-21T03:05:49+5:302016-02-21T03:05:49+5:30
अमेरिकेने पाकिस्तानला सर्वात विकसित असे एफ-१६ हे लढाऊ विमान पुरवठा करण्याचा निर्णय घेऊन आम्ही भारतासोबत नाही पाकिस्तानसोबत आहोत, हे दाखवून दिले आहे.
प्रकाश आंबेडकर : अपयश लपविण्यासाठीच जेएनयू प्रकरण
नागपूर : अमेरिकेने पाकिस्तानला सर्वात विकसित असे एफ-१६ हे लढाऊ विमान पुरवठा करण्याचा निर्णय घेऊन आम्ही भारतासोबत नाही पाकिस्तानसोबत आहोत, हे दाखवून दिले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘बॅक डोअर डिप्लोमसी’ ही पूर्णपणे ‘फेल्युअर’ ठरली आहे. आपले हे अपयश लपविण्यासाठीच जेएनयू प्रकरण घडविण्यात आले आहे, असा थेट आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.
अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, जेएनयू (जवाहरलाल नेहरू विद्यापीठ) प्रकरण असो की हैदराबाद येथील रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण असो यासंदर्भात केंद्र शासनाची भूमिका ही पूर्णपणे दिशाहीन आणि संभ्रमात टाकणारी आहे. पीडीपीचे अध्यक्ष मुफ्ती मोहम्मद सईद यांनी अफजल गुरू आमचे गुरू आहेत, असे जाहीर वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यातून त्यांनी कधी माघार घेतली नाही. त्याच पीडीपीसोबत भाजपाने हातमिळवणी करून काश्मीरमध्ये सरकार स्थापन केले. त्याच अफजल गुरूसंदर्भातील चर्चा जेव्हा जेएनयूमध्ये होते तेव्हा त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो. तेव्हा भाजपने हे जे केले ते देशद्रोहाच्या कायद्यात बसते की नाही, याचा खुलासा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने करावा, असे आव्हानसुद्धा त्यांनी दिले. केवळ घोषणा दिल्या म्हणून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करता येत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने एक नव्हे दोनदा निर्णय दिला असतानाही केवळ आपले अपयश लपविण्यासाठी शासन तरुणांवर देशद्रोहाचे आरोप लावत असेल तर हे दुर्दैव आहे. हीच आरएसएसची राष्ट्रभक्ती आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)
भाजपा-आरएसएसने देशाला ऐरणीवर टाकले
काश्मीरमध्ये अनेक प्रकारचे लोक राहतात. तेथील अतिरेकी हे वेगवेगळे लढत होते. ते कधीच एकत्र आले नाही. अफजल गुरूच्या फाशीमुळे त्यांना एकत्र येण्याची संधी काँग्रेस आणि भाजपने उपलब्ध करून दिली. तसेच काश्मीरमध्ये आजवर जे काही होत होते, त्याचा आवाज हा देशाबाहेर फारसा जात नव्हता. परंतु जेएनयू प्रकरणामुळे हा मुद्दा आता जगभरात पोहोचला असून काश्मीरप्रश्न आणखी बिकट झाला आहे. याप्रकरणी जी संवेदनशीलता शासनाने दाखवायला हवी होती, त्याचा अभाव दिसून आला. राजकीय लाभासाठी हिंदू मतांच्या ध्रुवीकरणासाठी भाजपा आणि आरएसएसने देशाला ऐरणीवर टाकले आहे, असा आरोपही अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
मारहाण करणाऱ्या वकिलांचे परवाने रद्द करावे
कन्हय्या याच्यावर न्यायालय परिसरात हल्ला करणाऱ्या वकिलांचे परवाने रद्द करण्यात यावे. बार कौन्सिलने त्यांची सनद रद्द करावी. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि दोषी आढळल्यास शिक्षा करावी, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.