अनन्याच्या पत्राने भारावले मोदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 01:29 AM2017-10-13T01:29:55+5:302017-10-13T01:30:09+5:30
अनन्या वशिष्ठ वय वर्षे ६, या चिमुकलीच्या पत्रातील मायना वाचून कुणी थक्क होईल, तिला लगेच प्रतिउत्तर देईल, अशी शक्यता तशी कमीच.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनन्या वशिष्ठ वय वर्षे ६, या चिमुकलीच्या पत्रातील मायना वाचून कुणी थक्क होईल, तिला लगेच प्रतिउत्तर देईल, अशी शक्यता तशी कमीच. पण या चिमुकलीने एक पत्र थेट या देशाच्या पंतप्रधानांना लिहिले आणि कुणाच्याही ध्यानीमनी नसताना, स्वत: पंतप्रधानांनी या पत्राची दखल घेत, चिमुकलीच्या पत्राला प्रतिउत्तरही पाठविले.
देशाचा पंतप्रधान म्हणजे कायम कामात गुंतलेला, अशा स्थितीत एखाद्या चिमुकलीचे पत्र वाचून तिला प्रतिउत्तर पाठविणे ही तशी अशक्यप्राय गोष्ट परंतु, वर्तमान पंतप्रधानांच्या सजग व लोकाभिमुख वृत्तीमुळे असे घडले असून, अनन्या वशिष्ठ हिला पाठविलेल्या पत्रामुळे तिच्या कुटुंबीयांनाही कुतुहल वाटते आहे.
वाडी परिसरातील लाईफस्टाईल सोसायटीमध्ये राहणाºया अनन्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा लिहून पत्र पाठविले होते. पहिल्या वर्गात शिकणाºया अनन्याने पेन्सिलने संस्कृतमध्ये शुभेच्छा लिहिल्या. त्याचबरोबर तिने स्वच्छ भारत अभियान व बेटी बचाव या अभियानाची चित्रेसुद्धा काढली आणि वडिलांच्या मदतीने थेट पंतप्रधान कार्यालयाला पोस्ट केले होते.
चिमुकलीने पेन्सिलीने लिहिलेल्या पत्राला पंतप्रधान का बरे उत्तर देतील, असा विचार करून अनन्याचे कुटुंबीय विसरले होते.
मात्र १० आॅक्टोबर रोजी अनन्याच्या नावाने नवी दिल्लीतून पोस्टाने एक पत्र आले. तेही थेट पंतप्रधान कार्यालयातून. त्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी अनन्याने दिलेल्या शुभेच्छांसाठी धन्यवाद तर दिलेच होते, शिवाय तिचे आगळवेगळे अभीष्टचिंतन ऊर्जा वाढविणारे असून, पुढे दुप्पट जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारे आहे, असे ही मोदींनी पत्राद्वारे कळविले.
पंतप्रधानांनी सर्व नागरिकांच्या प्रयत्नांनी स्वच्छ भारत झाल्याशिवाय राहणार नाही असेही या पत्रात नमूद केले आहे.
अनन्या दाभा येथील सांदीपनी शाळेची विद्यार्थिनी आहे. ती पहिल्या वर्गात शिकते, ड्रॉर्इंग काढणे, खूप खेळणे आणि सामान्य ज्ञानासंदर्भात माहिती गोळा करणे तिला आवडते.