आरपीएफची मोहल्ला गस्त, फिरून गोळा केली जात आहे समाजकंटकांची माहिती
By नरेश डोंगरे | Published: August 26, 2023 06:12 PM2023-08-26T18:12:51+5:302023-08-26T18:13:15+5:30
रेल्वेतील गुन्हेगारी नियंत्रित करण्यास मदत
नागपूर : रेल्वेतील गुन्हेगारी कमी करण्यासाठी आणि रेल्वेत गुन्हेगारी करणाऱ्या समाजकंटकांना हुडकून काढण्यासाठी रेल्वे लाईनलगत असलेल्या मोहल्ल्यात रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी 'मोहल्ला गस्त' सुरू केली आहे.
रेल्वे स्टेशन किंवा रेल्वे लाईनलगत वस्ती (मोहल्ला) असल्यास लोको पायलटकडून रेल्वे गाड्यांची गती कमी केली जाते. ही संधी साधून चोर-भामटे प्रवाशांची बॅग अथवा माैल्यवान चिजवस्तू हिसकावून घेतात आणि लगेच गाडीतून उतरतात. पळतच ते बाजुच्या मोहल्ल्यातून दिसेनासे होतात. अनेक चोरीच्या घटनांमध्ये चोरटे हा सारखा फंडा वापरतात. नंतर ते काही हाती लागत नाहीत.
चोरीची तक्रार दाखल करणाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून हा फंडा लक्षात आल्यामुळे अशा सराईत चोर भामट्यांचा छडा लावण्यासाठी रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) रेल्वे लाईनजवळच्या वस्तीत जनजागरण सुरू केले आहे. या माध्यमातून जीआरपी आणि आरपीएफ संशयीत तसेच सराईत गुन्हेगारांची माहिती वस्तीतील नागरिकांना देतात आणि संशयीतांची माहिती नागरिकांकडून घेतली जाते. रेल्वेत गुन्हे करून कुणी संशयास्पद अवस्थेत पळताना दिसल्यास जीआरपी किंवा आरपीएफला तातडीने माहिती देण्याचे आवाहनही या माध्यमातून केले जाते.
समाजकंटकांना आवर
अनेकदा काही समाजकंटक कारण नसताना धावत्या ट्रेनवर दगडफेक करतात. त्यात निर्दोष प्रवाशाला जबर दुखापत होते. ज्याला दुखापत झाली त्याला दगडफेक करणाऱ्याची माहिती नसते. मात्र, अशी मानसिकता बाळगणाऱ्यांची त्या मोहल्ल्यातील नागरिकांना माहिती असते. त्यांच्याकडून ती पोलिसांना कळते. काही दिवसांपूर्वी वंदे भारत वर अशीच दगडफेक करणारांची माहिती मिळवून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. मोहल्ल्यातील नागरिकांचा पोलीस मित्र म्हणून वापर केला जात असल्याने समाजकंटकांना आवर घालण्यास फायदा मिळत असल्याचे रेल्वे पोलीस सांगतात.