मोहम्मद शमी प्रकरणाचे नागपुरातील दहेगाव कनेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 02:32 PM2018-03-12T14:32:26+5:302018-03-12T14:32:41+5:30
भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी याच्यावर त्याच्या पत्नीने केलेल्या गंभीर आरोपांचे कनेक्शन सावनेर तालुक्यातील दहेगाव(रंगारी)शी असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी दिल्ली पोलीस दहेगाव (रंगारी) येथे २४ तासात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, याला खापरखेडा पोलिसांनी दुजोरा दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी याच्यावर त्याच्या पत्नीने केलेल्या गंभीर आरोपांचे कनेक्शन सावनेर तालुक्यातील दहेगाव(रंगारी)शी असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी दिल्ली पोलीस दहेगाव (रंगारी) येथे २४ तासात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, याला खापरखेडा पोलिसांनी दुजोरा दिला आहे. मोहम्मद शमीच्या पत्नीने केलेल्या आरोपांपैकी एक तरुणी ही दहेगाव (रंगारी) येथील रहिवासी असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. तिचे वडील ट्रकचालक असून, तिने कोराडी येथील विद्यामंदिर हायस्कूल आणि नागपूर येथील तिरपुडे महाविद्यालयात शिक्षण घेतल्याने तिच्या फेसबुक अकाऊंटमध्ये नमूद आहे. ती मोहम्मद शमी याच्या संपर्कात कशी आली, याबाबत कुणालाही माहिती नाही. शिवाय, तिने फेसबुकवर मोहम्मद शमीसोबतचा फोटो अपलोड केला होता. सदर प्रकरण प्रकाशात येताच तिने तो फोटो नंतर डिलिट केला. सध्या ती दहेगाव येथील तिच्या घरी नसल्याचेही आढळून आले. ती नेमकी कुठे आहे, याबाबत कुणालाही माहिती नव्हती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलीस २४ तासांत दहेगाव (रंगारी) येथे येणार असल्याचे खापरखेडा पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाबाबत पोलिसांनीही कमालीची गुप्तता पाळली आहे.