घातक गोलंदाजी करत मोहम्मद शमीने बुकींचेही कंबरडे मोडले
By नरेश डोंगरे | Published: November 16, 2023 09:03 PM2023-11-16T21:03:10+5:302023-11-16T21:03:23+5:30
तीन दिवसांनंतर सुरू झाली होती दुकानदारी
नरेश डोंगरे
नागपूर : घातक गोलंदाजी करत मोहम्मद शमीने केवळ न्युझिलंडच्या संघाचेच नव्हे तर शेकडो बुकींचेही कंबरडे मोडले. बुधवारी पार पडलेल्या आयसीसी वन-डे विश्वचषकाच्या सेमिफायनल मॅचमध्ये अनेक बुकींना कोट्यवधींचा फटका बसला. भारतीय संघाने एकीकडे धावांचा पाऊस पाडत सेमिफायनल जिंकले तर दुसरीकडे नकळतपणे नवख्या बुकींचे खिसे अक्षरश: फाडून काढले.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रविवारी भारताविरुद्ध नेदरलँड्समध्ये सामना झाला. हा सामना भारतीय संघ हमखासपणे जिंकणार, हे सर्वांनाच माहिती होते. अर्थात् भारताच्या जिंकण्यावरच सटोडे रक्कम लावणार असल्याने बहुतांश बड्या बुकींनी आपले शटर डाऊन केले होते. रविवार, सोमवार आणि मंगळवार असे तीन दिवस ते डाऊनच होते.
कोट्यवधी रुपये खिशात कोंबल्यानंतर बुकींनी धडाक्यात लक्ष्मीपूजन केले. त्यानंतर बुधवारी नव्या जोमाने बुकींनी आपला पाना उघडला. सामना सुरू होत असताना क्रिकेट मॅचच्या सट्टाबाजारात ओपनिंग रेट होता ३९-४१ चा, लगेच तो ३६-३८ वर आला आणि भारतीय संघाने डावाचा डोंगर उभा केल्याने बुकींच्या खिशांवरचा भार चांगलाच वाढला. विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने शतकी डाव खेळल्याने खिसे फाटणार याची कल्पना आल्याने बुकींनी वेगवेगळी डावबाजी करून सट्टेबाजांना थोपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोहम्मद शमीने घातक गोलंदाजी करून न्युझिलंडच्या संघालाच नव्हे तर बुकींनाही गारद केले. गारद होणाऱ्या बुकींमध्ये नवख्या बुकींची संख्या जास्त आहे.
तिकडे हिशेब चुकता, ईकडे थकला
गेल्या वेळी अर्थात २०१९ च्या विश्व चषकाच्या सेमिफायनलमध्ये न्युझिलंडने भारतीय संघाला हरवून बाहेरची वाट दाखवली होती. यावेळी भारतीय संघाने सेमिफायनलमध्ये न्युझिलंडची धुळधाण उडवत गेल्या वेळीचा हिशेब चुकता केला. क्रिकेट विश्वातील हा हिशेब चुकता झाला असला तरी बुकींच्या बाजारात शेकडो कोटींच्या लगवाडी खयवाडीचा हिशेब थकला असून तो फायनल संपल्यानंतर चुकवला जाणार आहे.
प्रबळ दावेदाराच्या भावाकडे लक्ष
विश्व चषक पटकविण्यासाठी आंतरराष्ट्रीय बुकी बाजारात प्रारंभी 'मेन ईन ब्ल्यू'ला ९० पैसे एवढा जास्त भाव होता. मात्र, सलग प्रत्येक सामना जिंकणाऱ्या भारतीय संघाने बुकी बाजाराचे गणित चुकवले. बुधवारच्या सामन्यानंतर विश्व चषकाचा प्रबळ दावेदार म्हणून भारतीय संघ पुढे आला आहे. आता बुकींकडून भारतीय संघाला कोणता भाव दिला जातो, त्याकडे सटोड्यांचे लक्ष लागले आहे.