मोहम्मद रफींची ‘सावली’ हरवली : गायक मोहम्मद अझीझ यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 01:10 AM2018-11-28T01:10:32+5:302018-11-28T01:14:06+5:30
दोघांच्याही नावात मोहम्मद होते. एक मोहम्मद रफी तर दुसरा मोहम्मद अझीझ. मोहम्मद रफींची गायनाची शैली अंगिकारून मोहम्मद अझीझ यांनी आयुष्यभर संगीताची पूजा बांधली, म्हणूनच त्यांना मोहम्मद रफींची ‘सावली’ संबोधले जायचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरात समग्र मानव कल्याणाचा संदेश देणाऱ्या धम्माची दीक्षा घेतली. त्यामुळे मोहम्मद अझीझ यांचे नागपूरवर विशेष प्रेम होते.
सुमेध वाघमारे
नागपूर : दोघांच्याही नावात मोहम्मद होते. एक मोहम्मद रफी तर दुसरा मोहम्मद अझीझ. मोहम्मद रफींची गायनाची शैली अंगिकारून मोहम्मद अझीझ यांनी आयुष्यभर संगीताची पूजा बांधली, म्हणूनच त्यांना मोहम्मद रफींची ‘सावली’ संबोधले जायचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरात समग्र मानव कल्याणाचा संदेश देणाऱ्या धम्माची दीक्षा घेतली. त्यामुळे मोहम्मद अझीझ यांचे नागपूरवर विशेष प्रेम होते.
एका कार्यक्रमाच्यानिमित्ताने २५ एप्रिल २०१४ रोजी ते नागपुरात आले असताना एका खासगी चॅनलने त्यांची मुलाखत घेतली. यात त्यांनी आपल्या जीवनातील काही अंतरंग उलगडले होते. विशेषत: बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल ते भरभरून बोलले.
बाबासाहेबांमुळेच खऱ्या अर्थाने अस्पृश्य समाज स्वतंत्र झाला. हा महामानव जन्माला आला नसता तर गावकुसाबाहेरचा हा वंचित समाज कधीच समाजाच्या मुख्य प्रवाहाचा भाग झाला नसता, याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. ही मुलाखत प्रत्यक्ष पाहणाऱ्या शेकडो नागपूरकरांनी तेव्हा मोहम्मद अझीझ यांच्या या आंबेडकरप्रेमाचे विशेष कौतुकही केले होते. आज त्यांच्या मृत्यूची बातमी शहरात धडकली आणि त्या गाजलेल्या मुलाखतीचे सर्वांना स्मरण झाले.
मोहम्मद अझीझ यांचा जन्म २ जुलै १९५४ रोजी पश्चिम बंगालमधील अशोकनगर येथे झाला. १९८०-९० दरम्यान त्यांनी सुपरहिट गाणी गायली. दूध का कर्ज, खुदा गवाह, हीना, स्वर्ग, गीत यासारख्या चित्रपटांत पार्श्वगायन केले. तर ‘मर्द टांगेवाला’, ‘लाल दुपट्टा मलमल का’, ‘मैं से मीना से न साकी’, ‘आपके आ जाने से’ प्यार हमारा अमर रहे, ऐ मेरे दोस्त, तेरी बेवफाई का शिकवा, मितवा भूल ना जाना, फूल गुलाब का, दुनिया में कितना गम है, रब को याद करू, बहुत जताते हो, तू कल चला जायेगा, यासारखी सुपरहिट गीते दिली.
नागपुरात एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असताना त्यांनी दिलेल्या एका संगीताचा प्रवास उलगडला. ते म्हणाले, माझे गुरू व आदर्श मोहम्मद रफी यांचे गाणे गातच लहानाचा मोठा झालो. चित्रपटात गाणी गाण्याची पाहिली संधी ‘अंबर’ या चित्रपटात मिळाली. परंतु प्रसिद्धी आणि ओळख मिळाली ते ‘मर्द’ या चित्रपटातील ‘मै मर्द टांगेवाला’ या गाण्यातून. त्यानंतर सर्वच संगीतकारांसोबत गाणी गायिली. माझ्या करिअरमध्ये प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक उषा खन्ना यांनी बरीच मदत केली. त्या माझ्या बहिणीसारख्या होत्या. लक्ष्मीकांत- प्यारेलाल यांच्यासोबत २७७ गाणी गायिली. त्यांच्यासोबत काम करणे कठीण असले तरी एक उत्साह असायचा, असेही ते म्हणाले. या मुलाखतीपूर्वी त्यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. परिवर्तनाची भूमी त्यांनी अनुभवली. म्हणूनच मुलाखतीत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आवर्जून उल्लेख केला. अस्पृश्यांना खरे स्वातंत्र्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मिळाले, असे म्हणत बाबासाहेबांच्या कार्याची महती सांगितली. त्यांनी आपल्या नागपुरातील ‘मोहम्मद अझीझ लाईव्ह कॉन्सेट’मध्ये ‘जयभीम जयभीम, जयभीम राया दलितों का तुमने भाग्य जगाया’, हे गीतही सादर केले होते.