चित्रपटांचे ‘एनसायक्लोपीडिया’ ज्येष्ठ सिनेवितरक मोहनसिंग अरोरा यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 10:58 PM2019-09-26T22:58:42+5:302019-09-26T23:01:11+5:30
कधी काळी सायकलवर फिरून चित्रपटांचे प्रमोशन करणारे, सिनेक्षेत्राची इत्थंभूत माहिती असलेले चित्रपटांचे ‘एनसायक्लोपीडिया’ आणि जुन्या काळातील ज्येष्ठ सिनेवितरक मोहनसिंग अरोरा यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कधी काळी सायकलवर फिरून चित्रपटांचे प्रमोशन करणारे, सिनेक्षेत्राची इत्थंभूत माहिती असलेले चित्रपटांचे ‘एनसायक्लोपीडिया’ आणि जुन्या काळातील ज्येष्ठ सिनेवितरक मोहनसिंग अरोरा यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मोहनसिंग यांनी ५० पेक्षा अधिक वर्षे चित्रपट वितरणाच्या क्षेत्रात काम केले. दारासिंग, देव आनंद, धर्मेंद्र, जितेंद्र, बलराज साहनी, प्रेम चोपडा, खय्याम, बडजात्या कुटुंब अशा कितीतरी मोठ्या स्टार्सशी त्यांचे घरोब्याचे संबंध होते व हे कलावंत कधी नागपूरला आले की मोहनसिंग यांची भेट ठरलेली असायची. वृद्धापकाळात परिस्थिती हालाखीची झाल्याने त्यांना झोपडीत दिवस काढावे लागत होते. तत्कालिन सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली. राज्य शासनातर्फे पंचशील टॉकीज येथे झालेल्या चित्रपट महोत्सवात त्यांना सन्मानित करण्यात आले. कामठी रोडवरील टेकानाका परिसरात वास्तव्यास असलेल्या मोहनसिंग एका सिने नियतकालिकात चित्रपट व्यवसायाबाबत लेखन करायचे. देशभरात फ्लॉप झालेले चित्रपट नागपुरात चालवून दाखवायची क्षमता त्यांच्यात होती. त्यामुळे चित्रपट सृष्टीत त्यांच्याविषयी आदर होता. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती व मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सिने क्षेत्राचा जुना जाणकार हरविल्याची संवेदना या क्षेत्राशी जुळलेल्या मान्यवरांनी व्यक्त केली.