मोहगाव झिल्पी तलाव ठरतोय पर्यटकांसाठी धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:09 AM2021-05-19T04:09:09+5:302021-05-19T04:09:09+5:30
मनोज झाडे हिंगणा : हिंगणा तालुक्यातील मोहगाव-झिल्पी तलाव पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. हा तलाव हिंगणा शहरापासून फक्त ...
मनोज झाडे
हिंगणा : हिंगणा तालुक्यातील मोहगाव-झिल्पी तलाव पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. हा तलाव हिंगणा शहरापासून फक्त दहा किलोमीटर अंतरावर आहे. तसेच नागपूर शहराला लागून असल्याने शहरातील पर्यटक या तलावाकडे आकर्षित होत असतात. मात्र यातील काही हौैसेपोटी जीव गमावून बसतात. मोहगाव झिल्पी तलाव परिसर हा निसर्गरम्य सौंदर्याने नटलेला आहे. मोठा जंगल टेकडीचा भागही या तलावाला मिळाला आहे. आ. समीर मेघे यांनी २१ मार्च २०१७ रोजी या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी ५३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र लाखो रुपये खर्च करूनही सौंदर्यीकरणाच्या नावावर फक्त रस्ते आणि गॅलरीचे बांधकाम करण्यात आले. या कामातही गुणवत्ता नाही. परंतु येथील सुरक्षेकडे कुठल्याही प्रकारे लक्ष देण्यात आले नाही. गत दहा ते पंधरा वर्षात या तलावात १०० पेक्षा जास्त लोकांचा बुडून मृत्यू झाला. मात्र अद्यापही शासनस्तरावरून या तलावाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे सुरक्षा यंत्रणा उभारण्याचे कार्य केले गेले नाही. म्हणूनच शेकडो जीव या ठिकाणी गेल्याची चर्चा परिसरात आहे. कुठेही सूचना फलक नाही. त्यामुळे स्थानिक प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत किती गंभीर आहे, हे यावरून सिद्ध होते.
-
गावातील वनसामिकडे हे पर्यटन स्थळ हस्तांतरित करावे. आम्ही दोन सुरक्षा रक्षक नेमू. यासोबत पर्यकांसाठी चांगली व्यवस्था निर्माण करू. यातून स्थानिक युवकांना रोजगार मिळेल. यासाठी वारंवार वनविभागाला मागणी केली. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने ही जागा वनविभागाला हस्तांतरित केली नसल्याचे वनविभागामार्फत सांगण्यात आले.
- प्रमोद डाखले, सरपंच, मोहगाव-झिल्पी
-
या तलावातून मृतदेह काढताना मृतांच्या कुटुंबीयांचा आक्रोश पाहून मन सुन्न होते. कुणाच्या तरी घरातील सदस्य या तलावात जीव गमावत असतो. शासन स्तरावर याठिकाणी सुरक्षात्मक उपाययोजना होणे गरजेचे आहे. पोलीस प्रशासनाकडून विशिष्ट दिवशी या ठिकाणी बंदोबस्त असतोच. पण २४ तास नागरिकांवर पाळत ठेवणे हे पोलिसांनाही शक्य नाही.
सपना क्षीरसागर
सहायक पोलीस निरीक्षक, हिंगणा