मोहितच्या ‘मसक्कली’ची नागपूरकरांवर मोहिनी
By admin | Published: February 29, 2016 02:39 AM2016-02-29T02:39:57+5:302016-02-29T02:39:57+5:30
नुकताच पाऊस थांबला होता. वाद्यवृंदांची धडधड सुरू झाली. इकडे ‘मोहित...मोहित...’च्या आवाजाने नागपूरकरांच्या उत्साहाला उधाण आले होते.
महोत्सवात थिरकले नागपूरकर : रॉकस्टार अंदाज, तरुणाई बेधुंद
नागपूर : नुकताच पाऊस थांबला होता. वाद्यवृंदांची धडधड सुरू झाली. इकडे ‘मोहित...मोहित...’च्या आवाजाने नागपूरकरांच्या उत्साहाला उधाण आले होते. अगदी एखाद्या रॉकस्टारसारखा हृदयाचे ठोके चुकवावे तसा मोहित चौहान त्याच्या खास अंदाजात स्टेजवर अवतरीत झाला आणि नागपूरकरांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याला साद दिली. ‘जो भी मै, कहना चाहू...’ रॉकस्टार चित्रपटाच्या या गीतासह त्याची एन्ट्री अख्ख्या तरुणाईला भुरळ पाडणारी ठरली.
वर्षांपूर्वी पॉप सिंगर म्हणून ‘डुबा डुबा रहता हुं...’ या गाण्याने मोहितची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली. मात्र ‘रॉकस्टार’ या चित्रपटाच्या थेट हृदयाला भिडणाऱ्या गीतांनी मोहित बॉलिवूडमधला आघाडीचा गायक झाला. त्याच्या खास अंदाजातील गीतांनी तरुणाईला वेड लावले. मोहितचा तोच अंदाज आणि तरुणाईचे तेच वेड रविवारी नागपूर महोत्सवात अनुभवायला मिळाली. धमाकेदार, मात्र तेवढीच रोमॅन्टीक आणि मनाला भावणारी तरल प्रेमाची अनुभूती मोहितच्या गीतामध्ये आहे. हळुवार असे ‘कुछ खास है, कुछ बात है..., कहीं ना लागे मन...’, दुराव्याची व्यथा दर्शविणारे ‘ये दुरीयाँ..., नैना लगीया बारीशा...’ व दुराव्यातही प्रेमाची वेगळी अनुभूती आहे असे सांगणारे ‘ना खोना है ये...’ नागपूरकरांना तल्लीन करणारे होते. खोडकर अंदाजातील ‘मटरगश्ती खुली सडक पे... ’ आक र्षक होते मात्र मोहितचे अतिशय गाजलेले ‘मसक्कली मसक्कली...’ श्रोत्यांच्या आग्रहाने त्याने गायले. मनाला भावणारा सुफी अंदाज प्रत्येक गायनात आहे आणि तो तसाच झळकतही होता. मधे गिटार हातात घेऊन त्याने पुन्हा ‘डुबा डुबा रहता हुं...’चा अंदाज ऐकविला. पुन्हा रॉकस्टार घेऊन येत ‘नादान परींदे घर आजा...’ ने तरुणाईला त्याने वेगळ्या विश्वात नेले. मात्र कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच प्रत्येकाच्या ओठांवर ज्या गीताचा आग्रह होता त्या गीताचे संगीत वाजताच तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले. त्याच्याच अंदाजात तेवढ्याच ताकदीने ‘साड्डा हक...’ गीत गाताच संपूर्ण यशवंत स्टेडियम टाळ्यांच्या कडकडाटाने निनादले. सरते शेवटी श्रोत्यांना संगीताच्या सुरेल दुनियेत नेण्यासाठी प्रवासावर निघालेल्या सुफी संताप्रमाणे ‘शामे मलंग सी...’ या गीताने मोहितने नागपूरकरांना अलविदा केले. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन अनुजा घाडगे हिने केले. यावेळी मोहित चौहान आणि त्याच्या चमूचा महापौर प्रवीण दटके व मनपा आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.
मान्यवरांची उपस्थिती
महोत्सवाला बहुतांश नगरसेवक, महापालिकेचे आजी- माजी पदाधिकारी यांच्यासह मान्यवरांनी हजेरी लावली. विभागीय आयुक्त अनुपकुमार, रेल्वे पोलीस अधीक्षक राजीव जैन, माजी महापौर अर्चना डेहनकर, नगरसेवक परिणय फुके, गोपाल बोहरे, बंडू राऊत, बाल्या बोरकर, गिरीश देशमुख, गौतम पाटील, आभा पांडे, निता ठाकरे, साधना बरडे, संगीता गिऱ्हे, विशाखा मैंद, माजी महापौर पुष्पा घोडे, नगरसेविका निलीमा बावणे, रश्मी फडणवीस, सारिका नांदूरकर, चेतना टांक, सुजाता कोंबाडे, बंडू तळवेकर, दीपक पटेल, माजी नगरसेवक अशफाक पटेल, विष्णू मनोहर, तेजिंदरसिंग रेणू, विपीन कामदार, अशोक कोल्हटकर. खंडविकास अधिकारी पवनीत कौर, आदिती हर्डीकर, अमित घाडगे, उपायुक्त, प्रमोद भुसारी, उपायुक्त संजय काकडे, अप्पर आयुक्त नयनागुंडे, उपायुक्त रंजना लाडे, नगररचना संचालक सुप्रिया थुल, सहा. आयुक्त महेश धामेचा, अग्निशमन विभाग प्रमुख राजेंद्र उचके, सहा.आयुक्त मिलिंद मेश्राम, सहा. आयुक्त अशोक पाटील, सहा. आयुक्त हरिश राऊत, उद्यान अधिक्षक सुधीर माटे, झोन आयुक्त राजेश कराडे, मुख्य अभियंता उल्हास देबरवार, अभियंता डी.डी. जांभुळकर, पोलिस उपायुक्त शैलेश बलकवडे, इशू सिंधू, श्रीकांत तरवडे, आदी उपस्थित होते.
अन् गर्दी वाढतच गेली
नागपूर महोत्सव आणि पाऊस हे गेल्या काही वर्षात समीकरणच झाले आहे. याही वर्षी पावसाने ऐन महोत्सवाच्या उद्घाटनालाच हजेरी लावली. पावसाच्या येण्याने अनेकांनी आडोसा शोधला. पावसामुळे महोत्सवाची रंगत हरवेल की काय अशी भीती असताना, पावसाने काही क्षणाची उसंत घेतली. उद्घाटनाचे सोपस्कार पार पडले. आडोशाला आलेले रसिक पुन्हा मैदानावर जमू लागले. सूत्रसंचालक अनुजा घाडगे हिने आपल्या शब्दांच्या मोहिनीने रसिकांमध्ये पुन्हा उत्साह संचारला. त्यातच मोहित चौहान यांचे स्टेजवर आगमन झाले. अन् हळुहळु गर्दी वाढतच गेली. सलग दोन तास मोहितने नागपूरकरांच्या उत्साहाला टिकवून ठेवले.
महोत्सव व पाऊस हे समीकरणच : महापौर
महापौर प्रवीण दटके म्हणाले, जेव्हा केव्हा नागपूर महोत्सव सुरू होतो पाऊस येतोच. पावसाचे आगमन हा आशीर्वाद समजून आज या महोत्सवाला सुरुवात होत आहे. यावर्षीही दहाही झोनमध्ये स्थानिक कलाकारांचे विविध कार्यक्रम आयोजित करून नागपूर महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेने महोत्सवासाठी पाठबळ देण्याची मागणी मान्य केली, असे सांगून त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. चार दिवस चालणारा हा महोत्सव नि:शुल्क असून नागपूरकरांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन दटके यांनी केले.
तरुणाईचा उत्साह
तरुणाईच्या हृदयावर राज करणाऱ्या मोहित चौहानचे नागपूर महोत्सवात आगमन होत असल्याने नागपूरकर तरुण, तरुणीचे कट्टे आज सायंकाळी यशवंत स्टेडियममध्ये पोहचले. सुरुवातीला पावसाने हजेरी लावल्याने तरुणाईच्या उत्साहावर पाणी फिरेल की काय अशी भीती होती. नागपुरात पहिल्यांदा येत असलेल्या मोहितला ऐकण्यासाठी पावसानेही काहिशी उसंत घेतली आणि मग काय, मोहितच्या प्रत्येक गाण्यावर तरुणाईचा जोश ओसंडून वाहू लागला. गाण्याची एक ओळ मोहित तर दुसरी ओळ रसिकांतून येत होती. या सोहळ्याला आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी मोबाईलचे फ्लॅश चकाकत होते. तरुणाईचे काही ग्रुप सेल्फी काढून धम्माल करीत होते. काहींनी गाण्यावर ताल धरला होता. मागच्या रांगेतील तरुण थिरकायला लागले होते. वन्स मोअरची डिमांड अन् टाळ्यांचा प्रचंड कडकडाट, मोहितच्या प्रत्येक गीताला मिळत होता.
मोहितसोबत श्रोत्यांनी गायले गाणे
‘जब वुई मेट’ चित्रपटातील ‘ना पाना है ये...’ हे गाणे त्यावेळी प्रत्येकाच्या ओठावर होते. मोहितने हे गाणे सुरू करण्यापूर्वी नागपूरकरांना सोबत गाण्याचा आग्रह धरला. तेव्हा नागपूरकरांनीही त्याच्या पाठोपाठ एकासुरात गाऊन त्याला मनमुराद साथ दिली. आणखी काही गीताच्या वेळीही श्रोत्यांनी त्याला तशीच साद दिली. नागपूरकरांच्या या प्रेमाने मोहितही भारावून गेला.