दोन टोळ्यांविरुद्ध एकाच वेळी मोक्का
By Admin | Published: July 10, 2016 01:56 AM2016-07-10T01:56:37+5:302016-07-10T01:56:37+5:30
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) शहर पोलिसांनी एकाच वेळी गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांवर
नागपूर : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) शहर पोलिसांनी एकाच वेळी गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांवर कारवाई केली. पोस्टर गँगचा युवराज माथनकर आणि त्याच्या साथीदारांवर हुडकेश्वर ठाण्यात दाखल गुन्ह्यांवरून तर इमामवाड्यात नगरसेवक गुड्डू ऊर्फ योगेश तिवारी यांच्या घरावर सशस्र हल्ला चढवणारा कुख्यात गुन्हेगार आशिष फेलिक्स ऊर्फ टकल्या आणि त्याचे साथीदार या त्या दोन टोळ्या होय. अतिरिक्त पोलीस आयुक्त सुहास वारके, गुन्हे शाखेचे रंजनकुमार शर्मा आणि उपायुक्त जी. श्रीधर यांनी एका पत्रकार परिषदेत आज ही माहिती दिली.
मंगळवारी ५ जुलैला हुडकेश्वर(दिघोरी)च्या सर्वश्रीनगरातील प्रॉपर्टी डीलर सारंग अवथनकर यांच्या घरी युवराज माथनकर आणि त्याच्या टोळीतील गुंडांनी हैदोस घातला होता. हेमंत पंजाबराव गावंडे, विशाल मिलिंद वासनिक, आशिष अशोक कानतोडे, युवराज माथनकर, शक्ती संजू मनपिया आणि रवी उमेश उमाठे या सशस्त्र गुंडांनी सारंगच्या घरावर हल्ला चढवला. ७ जुलै रोजी सारंगचे लग्न तत्पूर्वी ६ जुलै रोजी हळदीचा कार्यक्रम असल्याने त्याच्या सर्वश्रीनगर येथील घरात २५ ते ३० नातेवाईक उपस्थित होते. त्यांना धमकावून शिवीगाळ करून आरोपींनी गप्प केले. युवराज व हेमंतने पिस्तूल कानशिलावर लावून सारंगला मारहाण केली.
पहिल्यांदाच डबल धमाका
एकाच वेळी दोन टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची शहरातील ही पहिलीच कारवाई आहे. त्यामुळे गुन्हेगारी टोळ्यांमध्ये पुन्हा एकदा दहशत निर्माण झाली आहे. वारंवार गुन्हे करीत असल्याने समाजात दहशत असल्याचे लक्षात घेता या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे डॉ. वारके यांनी पत्रकारांना सांगितले.