धान्याची काळाबाजारी करणाऱ्या रॅकेटचे सूत्रधार मोकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:09 AM2021-03-08T04:09:16+5:302021-03-08T04:09:16+5:30
नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हजारो गोरगरिबांच्या हक्काचे धान्य गिळंकृत करून त्याची दिवसाढवळ्या खुल्या बाजारात विक्री करणाऱ्या ...
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हजारो गोरगरिबांच्या हक्काचे धान्य गिळंकृत करून त्याची दिवसाढवळ्या खुल्या बाजारात विक्री करणाऱ्या रॅकेटचा गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी छडा लावला. रॅकेटचे महत्त्वाचे मोहरे असलेल्या कुख्यात आकरे बंधूसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली. मात्र, या रॅकेटचे सूत्रधार अजूनही मोकाटच आहेत. हे मोकाट समाजकंटक दलालाच्या माध्यमातून तपास यंत्रणेच्या डोळ्यात धूळफेक करत चार दिवसांपासून धावपळ करीत आहेत. तपास यंत्रणा त्यांच्या मुसक्या का आवळत नाहीत, असा प्रश्न चर्चेला आला आहे.
रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणारे रॅकेट नागपुरात अनेक वर्षांपासून सक्रिय आहे. या रॅकेटचे नेटवर्क केवळ नागपूरच नव्हे तर महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातही आहे. डड्डा नावाने ओळखला जाणारा समाजकंटक तसेच त्याचा सवई नामक साथीदार हे रॅकेट संचालित करतात. गोरगरिबांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी सरकारकडून वितरित करण्यात येणारे शेकडो टन धान्य सरकारी गोदामातून निघते. मात्र, मध्येच हे समाजकंटक त्याची पद्धतशीर विल्हेवाट लावते. भंडारा, तुमसर, गोंदियासह ठिकठिकाणच्या मिलमध्ये पॉलिश करून हे धान्य छत्तीसगड, मध्यप्रदेशमध्ये पोहचते. त्याची नंतर खुल्या बाजारात सर्रास विक्री केली जाते. अशा प्रकारे गरिबांच्या हक्काचा घास हिसकावून घेणारे हे समाजकंटक धान्याच्या काळाबाजारीतून कोट्यवधी रुपये गिळंकृत करतात. या रॅकेटशी संबंधित असलेल्या पारडीतील कुख्यात आकरे बंधूंकडे गुरुवारी दुपारी पोलिसांनी छापा मारला. यावेळी पोलिसांनी तेथून सरकारी धान्याची ४४२ पोती तसेच ट्रक जप्त केला. तर, दिनेश आणि प्रदीप रामभाऊ आकरे तसेच जागोजी ढोबळे, बन्शी राऊत आणि अण्णा ऊर्फ वैभव जितेंद्र रेवतकर या पाच जणांना अटक केली. ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. या कारवाईला ४ दिवस झाले मात्र रॅकेटच्या सूत्रधारांपर्यंत पोलीस पोहचू शकले नाहीत. त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. दुसरीकडे स्वत:ची मानगूट वाचविण्यात आतापर्यंत यशस्वी ठरलेला समाजकंटक डड्डा, सवई आणि त्याचे साथीदार पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आकरे बंधूंसह अन्य साथीदारांना बाहेर काढण्यासाठी धावपळ करीत आहेत.
विशेष म्हणजे, आकरे बंधूंवर कारवाई होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. मात्र, या रॅकेटचे सूत्रधार पोलिसांशी सलगी असणाऱ्या दलालांच्या माध्यमातून प्रत्येक वेळी त्यांना सहीसलामत बाहेर काढण्यात यश मिळवतात. यावेळी असाच प्रकार होतो की, पोलीस गोडबोल्या दलालांना दूर ठेवून रॅकेटच्या सूत्रधारांची मानगूट पकडतात, असा प्रश्न निर्माण झाला होता. आकरे बंधू आणि साथीदारांच्या पीसीआरचा आज शेवटचा दिवस असल्यामुळे आणि रॅकेटचे साथीदार आजपर्यंत मोकाटच असल्याने गोडबोल्या दलालांनी पुन्हा एकदा डाव साधल्याची बाब या वर्तुळात चर्चेला आली आहे.
---
नाशिकच्या घोरपडे बंधूंशी कनेक्शन
सार्वजनिक वितरण प्रणालीत घुसखोरी करून चोरी तसेच काळाबाजारी करणाऱ्या नाशिकच्या घोरपडे बंधूंना तपास यंत्रणेने नुकतीच अटक केली आहे. त्यांनी साथीदारांच्या मदतीने १७५ कोटींची काळी कमाई केल्याचे सांगितले जाते. घोरपडे बंधूंच्या रॅकेटशी नागपुरातील डड्डा आणि साथीदारांचे धागेदोरे जुळले असल्याची संबंधित वर्तुळात चर्चा आहे.
---
ठाणेदार म्हणतात... शोध सुरू आहे।
पीसीआरची मुदत संपल्यामुळे आकरे बंधू आणि साथीदारांना सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलीस त्यांचा पीसीआर वाढवून मागतात, एमसीआर होतो, की त्यांना जामीन मिळतो, ते आज ठरणार आहे. दरम्यान, या संबंधाने पारडीचे ठाणेदार सुनील गांगुर्डे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी डड्डासह अनेकांचे नाव पुढे आल्याच्या माहितीला दुजोरा दिला. आम्ही आरोपीशी संबंधितांच्या मालमत्ता तसेच साथीदारांचा शोध लावण्याचे प्रयत्न करत असल्याचेही गांगुर्डे म्हणाले.
---