इमामवाड्यातील फुले टोळीवर मोक्का
By admin | Published: March 7, 2016 02:44 AM2016-03-07T02:44:20+5:302016-03-07T02:44:20+5:30
रामबाग, इमामवाड्यातील कुख्यात मयूर फुले आणि त्याच्या टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्या(मोक्का)नुसार कारवाई केली आहे.
नागपूर : रामबाग, इमामवाड्यातील कुख्यात मयूर फुले आणि त्याच्या टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्या(मोक्का)नुसार कारवाई केली आहे. मयूर सुरेश फुले (वय १८), त्याचा भाऊ हर्षद (रा. रामबाग), अमोल ताराचंद वाघमारे (वय १९), रितेश दीपक तायडे (वय १९), अभय विनोद कांबळे (वय १९), सूरज गोपाल पाटील, ऋतिक ऊर्फ काऱ्या विक्की खोब्रागडे (रा. रामबाग) आणि हिमांशु विश्वजित नांदगावे (वय २०, रा. भानखेडा मोमिनपुरा) अशी मोक्का लावलेल्या गुंडांची नावे आहेत.
पारडीतील अनिल वंजारे याची १३ फेब्रुवारीला कुख्यात फुले टोळीने तलवार, चाकूचे घाव घालून निर्घृण हत्या केली होती. यापूर्वीही या गुडांनी खुनाचा प्रयत्न, प्राणघातक हल्ले, लुटमार, खंडणी वसुली, बलात्कार, विनयभंग असे अनेक गुन्हे केले असून, त्यांची या भागात प्रचंड दहशत आहे. इमामवाड्यातील जाटतरोडी, मेडिकल परिसरात रात्रीच्या वेळी महिला-मुलींना उचलून नेऊन बलात्कार करण्याचे प्रकार नेहमीच घडतात. त्यात फुले टोळीतील गुंडांचा सहभाग असल्याची कुजबूज आहे. बदनामी तसेच जीवाच्या धाकाने कुणी तक्रार करण्याचे धाडस दाखवत नाही. त्यामुळे आरोपी कमालीचे निर्ढावले आहेत.
रामबाग इमामवाड्यात दहशत पसरविण्याच्या हेतूनेच फुले टोळीने वंजारेची हत्या केल्याचे तपासात उघड झाल्यामुळे या टोळीवर पोलिसांनी मोक्का लावला.
विशेष म्हणजे, मोक्का लावण्यात आलेल्या आठ गुन्हेगारांतील तिघे १६ ते १७ वर्षे वयोगटातील (अल्पवयीन) आहेत. बलात्कार, खून, खंडणी वसुलीसारखे गंभीर गुन्हे करायचे आणि अल्पवयीन म्हणून पोलीस कारवाईपासून बचाव करायचा, अशी या गुन्हेगारांची क्लृप्ती आहे. (प्रतिनिधी)
आठवी कारवाई
शहरातील गुन्हेगारी ठेचून काढण्यासाठी पोलिसांनी केलेली मोक्काची ही आठवी कारवाई आहे. पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव, सहआयुक्त राजवर्धन सिन्हा, श्रीकांत तरवडे, उपायुक्त ईशू सिंधू, यांच्या निर्देशानुसार एसीपी एस. डी. राठोड तसेच इमामवाड्याचे ठाणेदार शेखर तावडे यांनी ही कारवाई केली.