जर्मन जपान टोळीवर मोक्का
By admin | Published: June 18, 2017 01:54 AM2017-06-18T01:54:06+5:302017-06-18T01:54:06+5:30
शहरातील विविध भागात प्रचंड दहशत असलेल्या कुख्यात जर्मन जपान टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी
आठ दिवसात दुसरी कारवाई : एसआयटीचा प्रभाव वाढला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील विविध भागात प्रचंड दहशत असलेल्या कुख्यात जर्मन जपान टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई केली आहे. गुन्हेशाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी सहायक पोलीस आयुक्त सोमनाथ वाघचौरे उपस्थित होते.
वसीम ऊर्फ शेरा रशीद खान (वय २४), रशीद खान जरदार खान (वय ६५), अजहर खान रशीद खान (वय ३१), अमजद खान रशीद खान (वय ३३), राजा खान रशीद खान (वय ३५), परवेज खान जर्मन खान (वय ३४) आणि जावेद अन्सारी अब्दुल वहाब अन्सारी (वय ४८) असे मोक्का लावलेल्या जर्मन-जपान टोळीतील गुंडांची नावे आहेत. त्यांचा म्होरक्या अजहर खान असून, तो गंगानगरात राहतो.
खून, खुनाचा प्रयत्न, हाणामाऱ्या, खंडणी वसुली, लुटमार, घर, जमिनीवर जबरदस्तीने कब्जा मारणे, अपहरण करणे, वाहन हिसकावून नेणे आणि अशाच प्रकारच्या अनेक गंभीर गुन्ह्यात जर्मन जपान टोळीचे गुंड सहभागी असून, शहरातील विविध भागात या टोळीची प्रचंड दहशत आहे.
जरीपटका, गिट्टीखदान, मानकापूर, वाडीसह विविध पोलीस ठाण्यात या टोळीविरुद्ध दोन डझनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. तूर्त गिट्टीखदान आणि जरीपटका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तीन प्रकरणांची चौकशी सुरू आहे, असे उपायुक्त कदम यांनी स्पष्ट केले. २०११ मध्ये जाफरनगरातील रसूल प्राथमिक शाळेवर कब्जा करून या टोळीतील गुंडांनी शाळा संचालक, शिक्षक, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना धमक्या दिल्या आणि एक चांगली शाळा बंद पाडली. शाळेचा ताबा सोडण्यासाठी शाळा संचालिका शमसुन्निसा पठाण (वय ६२) यांना ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणाची तक्रार करूनही तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी शमसुन्निसा यांना न्याय देण्याऐवजी जर्मन जपान टोळीच्या गुंडांनाच मदत केली. त्यामुळे शमसुन्निसा प्रचंड दहशतीत आल्या होत्या.
गुन्हेगारांची घरवापसी
गेल्या वर्षी उपराजधानीतील गुंडांच्या टोळीवर पोलिसांनी मोक्का अन्वये कारवाई करण्याचा धडाका लावल्याने बहुतांश कुख्यात गुन्हेगार शहराबाहेर पळून गेले होते. मात्र, गेल्या काही महिन्यात पोलीस शांत झाल्याचे पाहून सर्वच्या सर्व गुन्हेगारांनी घरवापसी केली. एवढेच काय, नागपुरातून हद्दपार करण्यात आलेले अनेक गुन्हेगारही शहरातच वास्तव्य करीत आहेत. गेल्या आठ दिवसात गुंडांच्या दोन टोळ्यांवर पोलिसांनी मोक्काची कारवाई केल्यामुळे गुंडांच्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
परवेजविरुद्ध १५ प्रकरणात गुन्हे
या टोळीतील परवेज खान जर्मन खान याच्याविरुद्ध वेगवेगळ्या १५ प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. अजहरविरुद्ध ५, वसिमविरुद्ध ४, रशिदविरुद्ध ३, अमजदविरुद्ध २ तर राजा खान आणि जावेद अन्सारीविरुद्ध प्रत्येकी एका प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. एसआयटीने परवेज, रशिद आणि वसिम वगळता अन्य सर्वांना अटक केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.