कुख्यात निशांत-राधे टोळीवर मोक्का
By admin | Published: May 6, 2016 03:07 AM2016-05-06T03:07:53+5:302016-05-06T03:07:53+5:30
खंडणी वसुली आणि हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या पाचपावलीतील कुख्यात निशांत-राधे टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे.
१५ वी कारवाई : आणखी काही टोळ्या टप्प्यात
नागपूर : खंडणी वसुली आणि हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या पाचपावलीतील कुख्यात निशांत-राधे टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे. उपराजधानीत यंदाची ही मोक्काची १५ वी कारवाई आहे, अशी माहिती परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली.
या टोळीत निशांत ज्ञानेश्वर गौर (वय २७, लालगंज), राधेश्याम ऊर्फ तंट्या ऊर्फ राधे शिवदास खोब्रागडे (वय २२, रा. गंगाबाई घाट, स्वीपर कॉलोनी), शुभम ऊर्फ भुऱ्या विनायक बिनेकर (वय १९, रा. तांडापेठ), निखिल सुरेश जांभुलकर (वय २३, रा. भानखेडा), विक्की रामदास बावनकर (वय २४, कावरापेठ, बाबानगर) या गुंडांचा समावेश आहे.
पाचपावलीतील व्यापारी, कारखानदार, दुकानदार यांना शस्त्राचा धाक दाखवून ही टोळी खंडणी वसूल करीत होती. दिवसाढवळ्या घातक शस्त्रे हातात घेऊन फिरायचे आणि दहशत निर्माण करायची. खंडणी देण्यास नकार देणाऱ्यांना मारहाण करायची, त्यांना लुटायचे, प्राणघातक हल्ले करायचे, अशी या टोळीतील गुंडांची कार्यपद्धत आहे.
सलवार सूटचा कारखाना चालविणाऱ्या अजादुल खान यांना या गुंडांनी दोन हजारांची खंडणी मागितली होती. खान यांच्याकडे तांडापेठमधील संजय शामराव खापेकर (वय ३४) हा तरुण काम करीत होता. खापेकरने या टोळीला खंडणी वसुलीसाठी विरोध केल्यामुळे राधे आणि निशांत तसेच त्यांच्या गुंड साथीदारांनी १६ एप्रिलला संजय खापेकरची भीषण हत्या केली होती.
या गुन्ह्यानंतर टोळीतील गुंडांना अटक करण्यात आली. आर्थिक लाभासाठी टोळीतील गुंडांनी संघटितपणे अनेक गुन्हे केल्याचे स्पष्ट झाले.
त्यामुळे त्यांच्यावर मोक्काची कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे यांनी दिले.
त्यानुसार टोळीतील गुंडांवर मोक्का लावण्यात आल्याचे उपायुक्त संजय लाटकर यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले. (प्रतिनिधी)
उत्तर नागपुरात प्रचंड दहशत
या टोळीची उत्तर नागपुरात प्रचंड दहशत आहे. टोळीप्रमुख निशांत गौर याच्याविरुद्ध २०११ पासून तब्बल १० गुन्हे दाखल झाले. त्याने तहसील, लकडगंज, हुडकेश्वर आणि पाचपावलीत गुन्हे केले असून, सीताबर्डी आणि सदरमध्ये दरोडा, जबरी चोरीचेही तीन गुन्हे केले आहेत. तर, दोन वर्षांपासून राधे ऊर्फ तंट्या फारच आक्रमक झाला. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, मारहाण, लुटमारसह सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. अन्य आरोपींवरदेखील गुन्हे असून, एक आरोपी अल्पवयीन आहे. त्याला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
आवळे टोळीवरही मोक्का
बड्या घरचे तरुण, व्यापारी अन् चांगल्या पगाराच्या नोकरदारांना तरुणींच्या माध्यमातून फसवून बलात्काराचा आरोप लावून त्यांच्याकडून सुनियोजितपणे लाखोंची खंडणी उकळणाऱ्या आवळे टोळीवरही मोक्काची कारवाई केली जाणार आहे. तशी प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती उपायुक्त लाटकर यांनी पत्रकारांना दिली. या टोळीने एका तरुण रेल्वे कर्मचारी तसेच अनेकांना तरुणींच्या माध्यमातून फसवून लाखोंची खंडणी उकळली आहे. या टोळीच्या जाळ्यात अडकलेल्यांनी पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहनही लाटकर यांनी केले.