नागपुरात कर्करोगाच्या रुग्णांसाठी ‘मॉलिक्युलर लॅब’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2022 08:33 PM2022-02-21T20:33:05+5:302022-02-21T20:40:04+5:30
Nagpur News कर्करोगाचे अचूक निदान, उपचार व पूर्वानुमान करण्याकरिता आण्विक प्रयोगशाळा (मॉलिक्युलर लॅब) सुरू करण्यासाठी नागपुरात मेडिकलने पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे.
नागपूर : कर्करोगाचे अचूक निदान, उपचार व पूर्वानुमान करण्याकरिता आण्विक प्रयोगशाळा (मॉलिक्युलर लॅब) सुरू करण्यासाठी मेडिकलने पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. एक कोटी १५ लाख ४९ हजार रुपये निधीच्या या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास राज्यात नागपूर मेडिकलमधील ही एकमेव ‘लॅब’ असेल.
रक्ताच्या व गाठीच्या कर्करोगाचे पहिल्या टप्प्यातच अचूक निदान होऊन त्याच भागावर उपचार पद्धती केंद्रित केल्यास कर्करोगाची गंभीरता टाळता येते. सध्या ही उपचारपद्धती खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. परंतु ती महागडी व गरीब रुग्णांच्या आवाक्या बाहेरची आहे. याची दखल घेत मेडिकलच्या विकृतिशास्त्र विभागाने २०१९ मध्ये ‘मॉलिक्युलर लॅब’चा प्रस्ताव तयार केला. जिल्हा नियोजन समितीकडून याला मंजुरीही मिळाली. परंतु २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने याचा निधी कोविडकडे वळविण्यात आला. परिणामी, हा प्रस्ताव थंडबस्त्यात गेला. सध्या कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात आली. यामुळे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्या मार्गदर्शनात विकृतिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. दिनकर कुंभलकर यांनी सोमवारी पुन्हा हा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला.
- मेडिकलमध्ये कर्करोगाच्या रुग्णांची संख्या मोठी
डॉ. कुंभलकर यांनी सांगितले, विदर्भासह मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड व देशातील इतरही भागातून मोठ्या संख्येत रक्ताच्या व गाठीच्या कर्करोगाचे रुग्ण मेडिकलमध्ये येतात. या रुग्णांसाठी ‘मॉलिक्युलर लॅब’ महत्त्वाची असते. या लॅबसाठी नुकतेच एक महिला डॉक्टरचे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे.
- मेडिकलच्या विकासासाठी प्रयत्न
मेडिकलमधील रखडलेले प्रकल्प मार्गी लावून विकास साधण्याचा प्रयत्न आहे. यातून रुग्णांना अद्ययावत उपचार मिळतील, सोबतच विद्यार्थ्यांच्या कौशल्यात भर पडून चांगले डॉक्टरही घडतील. म्हणूनच ‘मॉलिक्युलर लॅब’चा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील ‘एन्डोक्रिनोलॉजी’ विभाग सुरू करण्यासाठीही बैठक घेण्यात आली.
- डॉ. राज गजभिये, प्रभारी अधिष्ठाता मेडिकल