नागपुरात विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीसोबत छेडछाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 09:10 PM2018-11-20T21:10:29+5:302018-11-20T21:11:40+5:30
विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीसोबत तिच्याच नात्यातील युवकाने छेडछाड केली. ही घटना चार महिन्यानंतर पुढे आली. या प्रकरणात लकडगंज पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीसोबत तिच्याच नात्यातील युवकाने छेडछाड केली. ही घटना चार महिन्यानंतर पुढे आली. या प्रकरणात लकडगंज पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.
प्रियांश प्रबुद्ध जैन असे आरोपीचे नाव असून तो झासी, उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. तो अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे. पीडित मुलगी मुंबई तर, प्रियांश दिल्ली येथे शिक्षण घेत आहे. पोलीस तक्रारीनुसार, गत १५ जुलै रोजी प्रियांश मुलीच्या घरी आला होता. त्यावेळी त्याने मुलीसोबत आक्षेपार्ह वर्तन केले. मुलीने विरोध केल्यानंतर त्याने मुलीला व तिच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलीने कुणालाही घटनेची माहिती दिली नाही. परंतु, तिची मानसिक अवस्था खालावली होती. कुटुंबीयांनी धीर देऊन सखोल विचारपूस केली असता मुलीने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. मुलीच्या कुटुंबीयांनी प्रियांशच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली असता, त्यांनी प्रियांशच्या वर्तनामुळे स्वत:च त्रस्त असल्याचे सांगितले. परिणामी, या घटनेची पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यावरून प्रियांशविरुद्ध छेडछाड व धमकावण्याचा गुन्हा नोंदविण्यात आल. प्रियांश सध्या दिल्लीमध्ये असून, तो पोलीस ठाण्यात आल्यानंतरच खरे काय ते पुढे येईल.