एकतर्फी प्रेमातून तरुणीचा विनयभंग; लग्नासाठी आग्रह करीत मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2022 04:22 PM2022-07-08T16:22:44+5:302022-07-08T16:26:05+5:30
आठ महिन्यांपूर्वी नातेवाइकाने काही कामानिमित्त आरोपीच्या मोबाईलवरून तरुणीला आधार कार्ड पाठविले होते. त्यामुळे आरोपीकडे तरुणीचा मोबाईल क्रमांक होता. यावरून तो तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता.
भिवापूर(नागपूर) : मोबाईल नंबरच्या आधारे झालेल्या ओळखीतून तरुणाने एकतर्फी प्रेम व्यक्त करीत तरुणीच्या घरात शिरत तिचा विनयभंग केला. एवढेच काय, तर लग्नासाठी आग्रह करीत तिला मारहाणही केली. सदर घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास स्थानिक सिद्धार्थनगर येथे घडली. आरोपी व फिर्यादी तरुणी चंद्रपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांतील रहिवासी आहेत.
राकेश रामाजी चहांदे (३५, रा. नवरगाव, ता. सिंदेवाही) तर तरुणी ही चिमूर तालुक्यातील रहिवासी असून सध्या ती भिवापूर येथील नर्सिंग कॉलेजमध्ये शिकत असल्यामुळे स्थानिक सिद्धार्थनगर परिसरात भाड्याच्या घरात वास्तव्यास आहे. प्राप्त माहितीनुसार तरुणीचा एक नातेवाईक हा आरोपीच्या घराशेजारी राहतो.
आठ महिन्यांपूर्वी नातेवाइकाने काही कामानिमित्त आरोपीच्या मोबाईलवरून तरुणीला आधार कार्ड पाठविले होते. त्यामुळे आरोपीकडे तरुणीचा मोबाईल क्रमांक होता. यावरून तो तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र तरुणी त्याला प्रतिसाद देत नव्हती. अशातच आरोपीने गुरुवारी सकाळच्या सुमारास भिवापूर गाठले. तरुणीच्या घरात शिरून तिचा विनयभंग केला. शिवाय लग्नासाठी आग्रह करीत शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता तिला मारहाणसुद्धा केली. आरडाओरड पाहून घरमालकाने धाव घेत तरुणीची सोडवणूक केली. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली. ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनात दुर्गा शंभरकर तपास करीत आहेत.