वैधमापन उपनियंत्रकाकडून महिलेचा विनयभंग; अजनी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल
By योगेश पांडे | Published: August 22, 2024 06:54 PM2024-08-22T18:54:41+5:302024-08-22T18:55:30+5:30
Nagpur : शासकीय अधिकारी असल्यामुळे आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वैधमापन विभागातील उपनियंत्रकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजनी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.
विजय झोटे (५७) असे आरोपी उपनियंत्रकाचे नाव आहे. तक्रारदार महिलेचे पती वजनमापे दुरुस्ती व उत्पादनाचे काम करतात. नवीन वजनमापे पडताळणीसाठी त्यांनी शासकीय शुल्क भरले होते. त्यांनी तसा ऑनलाइन अर्जदेखील केला होता. ७ ऑगस्ट रोजी विजय झोटेने महिलेच्या पतीचा फोनवर अपमान केला. त्यामुळे ते तणावात होते. ८ ऑगस्ट रोजी झोटे व दोन सहकारी महिलेच्या घरी पोहोचले. महिलेने झोटेने केलेल्या अपमानामुळे पती तणावात असल्याची बाब सांगितली. यावरून झोटेने काम न करण्याची धमकी देत निघून जातो असे म्हटले. महिलेच्या पतीचा हात धरत त्यांच्या कार्यशाळेतून बाहेर ओढत नेले. तसेच महिलेचादेखील हात पकडत ओढले.
महिला ओरडली असता झोटेने विनयभंग केला. या घटनेमुळे हादरलेल्या महिलेने अजनी पोलिस ठाण्यात त्याच दिवशी तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी चौकशी करून गुन्हा नोंदवितो अशी भूमिका घेतली. शासकीय अधिकारी असल्यामुळे झोटेंविरोधात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आली. महिलेने हे प्रकरण लावून धरण्याची भूमिका घेतल्यावर अखेर झोटेविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.