राजधानी एक्स्प्रेसमध्ये महिलेचा विनयभंग; जवानाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 08:21 PM2019-01-17T20:21:11+5:302019-01-17T20:21:37+5:30
नवी दिल्ली ते सिकंदराबाद असा प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाच्या झोपेचा फायदा घेऊन सैन्यात काम करणाऱ्या जवानाने तिचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान ग्वाल्हेर रेल्वेस्थानकाजवळ घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवी दिल्ली ते सिकंदराबाद असा प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाच्या झोपेचा फायदा घेऊन सैन्यात काम करणाऱ्या जवानाने तिचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान ग्वाल्हेर रेल्वेस्थानकाजवळ घडली. याप्रकरणी संबंधित महिला प्रवाशाने दिलेल्या तक्रारीवरून लोहमार्ग पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास ग्वाल्हेर लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द केले आहे.
अर्चना (बदललेले नाव) (३०) रा. सिकंदराबाद या व्यवसायाने सिकंदराबादला शिक्षिका आहेत. त्या राजधानी एक्स्प्रेसच्या कोच बी-१०, बर्थ ६० वरून नवी दिल्ली ते सिकंदराबाद प्रवास करीत होत्या. याच कोचमध्ये ५७ क्रमांकाच्या बर्थवरून आरोपी संदीप रामचंद्र (२६) रा. हरियाणा हा प्रवास करीत होता. आरोपी हैदराबादला सैन्यदलात आर्टी सेंटरमध्ये काम करतो. त्याने गुरुवारी रात्री ११.३० वाजता राजधानी एक्स्प्रेस ग्वाल्हेर रेल्वेस्थानकाजवळ असताना झोपेचा फायदा घेऊन महिलेचा विनयभंग केला. घडलेल्या घटनेमुळे संबंधित महिला प्रवासी घाबरली. एकटीच प्रवास करीत असल्यामुळे तिने तातडीने गाडीतील टीटीईला भेटून घडलेला प्रकार सांगितला. टीटीईच्या मदतीने या महिला प्रवाशाने आपला बर्थ बदलवून घेतला. त्यानंतर या घटनेची माहिती हेल्पलाईनच्या साहाय्याने लोहमार्ग पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षाने नागपूर लोहमार्ग पोलिसांना सूचना दिली. राजधानी एक्स्प्रेस सकाळी १०.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर येताच सहायक पोलीस निरीक्षक मुबारक शेख, महिला कॉन्स्टेबल अश्विनी रिंके यांनी महिलेचे बयाण नोंदवून घेतले. लोहमार्ग पोलिसांनी आरोपीला गाडीखाली उतरवून घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा ग्वाल्हेर लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत घडल्यामुळे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास ग्वाल्हेर लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले.