नागपुरातील मोमिनपुरा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 12:44 PM2020-04-06T12:44:09+5:302020-04-06T12:45:36+5:30
महापालिके च्या प्रभाग क्रमांक ८ मधील तकिया दिवाणशहा मोमिनपुरा परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. शहरातील नागरिकांचे हित विचारात घेता महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिके च्या प्रभाग क्रमांक ८ मधील तकिया दिवाणशहा मोमिनपुरा परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये, याकरिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने तसेच शहरातील नागरिकांचे हित विचारात घेता महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.
महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणूचा (कोविड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्चपासून लागू केला आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार आयुक्तांनी अधिसूचना निर्गमित केली आहे.
महाराष्ट्र कोविड-१९, उपाययोजना नियम २०२० यातील नियम ३ नुसार शहरी भागात महापालिका आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे. त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात कोविड-१९ वर नियंत्रण आणण्यासाठी व प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार आयुक्तांनी आदेश निर्गमित केले आहे.
घोषित प्रतिबंधित क्षेत्रात तकिया दिवाणशहा मोमिनपुरा या भागातील निश्चित केलेल्या कॅन्टोनमेंट एरियानुसार उत्तर पूर्वेस-तीन खंबा चौक, दक्षिण पूर्वेस नालसाब चौक, दक्षिण-पश्चिम भगवाघर चौक, पश्चिमेस जामा मशीद व उत्तर पश्चिमेस मोमिनपुरा चौक प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या भागात येणारे सर्व रस्ते सील करण्यात आले असून रहदारी बंद करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त नागपूर शहर यांनी या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी तसेच सर्व संबंधितांकडून सोशल डिस्टन्सिंगबाबत नियमांचे पालन करावे. मनपा आरोग्य अधिकारी यांना या भागात आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
.....
बंदीतून वगळण्यात आलेल्या बाबी
शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत कर्मचारी व अधिकारी
आवश्यक तातडीची वैद्यकीय सेवा तसेच अंत्यविधी.
वैद्यकीय सेवेशी संबंधित खासगी डॉक्टर, नर्स, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथालॉजिस्ट इत्यादी.
जीवनावश्यक वस्तूंचा सेवा पुरवठा करणारे व्यक्ती (पोलीस विभागामार्फत पास प्राप्त धारक)