मोगलकालीन नाण्यांवर चोरट्याचा डल्ला
By Admin | Published: September 15, 2016 02:27 AM2016-09-15T02:27:59+5:302016-09-15T02:27:59+5:30
एका भांडीविक्रेत्याच्या कुटुंबाने पणजोबाच्या काळापासून जपून ठेवलेला मोगल आणि ब्रिटिशकालीन मौल्यवान नाण्यांचा ठेवा अज्ञात चोरट्याने लंपास केला.
पणजोबाच्या काळापासून जपला होता ठेवा
भगवान श्रीरामाच्या राज्याभिषेकापासून ब्रिटिशकालीन नाणी
नागपूर : एका भांडीविक्रेत्याच्या कुटुंबाने पणजोबाच्या काळापासून जपून ठेवलेला मोगल आणि ब्रिटिशकालीन मौल्यवान नाण्यांचा ठेवा अज्ञात चोरट्याने लंपास केला. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत तांडापेठ तुमडी मोहल्ल्यात घडलेली ही घटना बुधवारच्या सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास उजेडात आली.
रवींद्र गणपतदास भामोडे (४२) यांच्याकडे ही घरफोडीची घटना घडली. त्यांचा इतवारी येथे भांडी विक्रीचा व्यवसाय आहे. भामोडे यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने त्यांनी तात्पुरत्या वास्तव्यासाठी बांधकाम सुरू असलेल्या घरासमोरच टिनाचे शेड उभारले आहे.
मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास भामोडे कुटुंब गणपती दर्शनासाठी हिल टॉप, सीताबर्डी आणि महाल भागात गेले होते. रात्री १.३० वाजताच्या सुमारास घराकडे परतले होते. टिनाचे शेड असलेल्या घराला पुन्हा कुलूप लावून भामोडे हे कुटुंबासह बांधकाम सुरू असलेल्या घरी झोपण्यास गेले होते. आज सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास त्यांची पत्नी सारिका भामोडे या टिनाच्या शेडच्या घरात गेल्या असता त्यांना घरातील व आलमारीतील सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसले. अज्ञात चोरट्याने वाचनालयाच्या सज्जावरून टिन शेडमध्ये घुसून घरफोडी केल्याचे लक्षात येताच रवींद्र भामोडे यांनी लागलीच पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
चोरट्याने आलमारीतून ५०० च्या २९ नोटा, मोगलकालीन, ब्रिटिशकालीन आणि भगवान श्रीरामाच्या राज्याभिषेकाची, लक्ष्मीची चांदीची १२४ नाणी, चांदीच्या चेन, हातातील आणि पायातील कडे, असा मोठा ठेवा लंपास केला. चोरी गेलेली नाणी १ किलो ८०० ग्रॅम वजनाची आहेत. पोलिसांनी या सर्व ऐवजाची किंमत केवळ २७ हजार ६०० रुपये आखली आहे.
असा जपला होता प्राचीन ठेवा
रवींद्र भामोडे यांचे पणजोबा नारायणदास हे पट्टीचे पहिलवान होते. श्रीमंत रघुजीराजे भोसले यांनी बक्षीस म्हणून त्यांना २२५ चांदीची नाणी दिली होती. त्यापैकीच ही १२४ नाणी होती. त्यात काही अरबी लिपीचा उल्लेख असलेली मोगल काळातील नाणी होती. काही व्हिक्टोरिया राणीची ब्रिटिश काळातील नाणी होती. १९९७ मध्ये दिल्लीच्या एका व्यापाऱ्याने भामोडे यांना प्रत्येक नाण्यामागे तीन लाख रुपये देण्याचे कबूल करून ही नाणी विकत मागितली होती. हा आमच्या पूर्वजांचा ठेवा आहे, असे सांगून भामोडे यांनी नाणी विकण्यास नकार दिला होता. १९९२ मध्ये पुरातत्त्व विभागाने ऐतिहासिक ठेवा असल्याचे सांगून गणपतदास भामोडे यांना ही नाणी मागितली होती. ही नाणी आमच्या पूर्वजांची असून आम्ही दर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करीत असतो, असे सांगून नाणी देण्यास नकार दिला होता. हल्ली दरवर्षी या नाण्यांची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा केली जात होती. आंतराष्ट्रीय बाजारापेठेत ही नाणी मौल्यवान आहेत. रवींद्र भामोडे यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध भादंविच्या ३८० कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस चोरट्याचा कसून शोध घेत आहेत.