कच्च्या तेलाच्या सौद्यात असेही मिळतात पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 10:04 AM2020-04-23T10:04:11+5:302020-04-23T10:04:35+5:30
जगभरातील सटोडिये कच्च्या तेलाच्या वायदे बाजारातील सौद्यामधून पैसे कमावतात. तसेच तेलवाहक जहाज (टँकर्स) भाड्याने घेऊनही प्रचंड पैसे कमावले जातात.
सोपान पांढरीपांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगभरातील सटोडिये कच्च्या तेलाच्या वायदे बाजारातील सौद्यामधून पैसे कमावतात. तसेच तेलवाहक जहाज (टँकर्स) भाड्याने घेऊनही प्रचंड पैसे कमावले जातात. हा गोरखधंदा कसा चालतो ते बघू या.
जगभर रोज ११० लक्ष बॅरल तेल खपते आणि साधारणत: ४० ते ४१ दिवस पुरेल एवढी म्हणजे ४,५०० लक्ष बॅरल एवढीच साठवणूक क्षमता सध्या उपलब्ध आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या दररोज कमी/जास्त होणाऱ्या भावामधून पैसे कमविण्यासाठी सटोडिये अनेक क्लृप्त्या वापरत असतात. टँकर भाड्याने घेणे हा त्यातलाच सर्वात लोकप्रिय प्रकार आहे.
तेलवाहक टँकर क्षमतेनुसार चार प्रकारचे असतात. त्यात पॅनामॅक्स (६० ते ७५ हजार टन), सुवेझ मॅक्स (७५ हजार ते १.२० लाख टन), अॅफ्रामॅक्स (१.२० लाख ते २ लाख टन) व व्हेरी लार्ज क्रूड कॅरिअर्स अथवा व्हीएलसीसी (२ ते ३ लाख टन) यांचा समावेश असतो.
सटोडिये तेलाच्या किमती कमी असताना तेल खरेदी करतात व ते टँकरमध्ये भरून घेतात. त्यानंतर तेल विक्रीची प्रक्रिया सुरू होते. सर्व सामाजिक, व्यापारी व राजकीय परिस्थिती बघून भाव किती वर जाईल, याचा अंदाज घेऊन सटोडिये एक टार्गेट भाव निश्चित करतात व तो मिळण्याची वाट पाहत बसतात. बरेचदा तेलवाहक जहाज संभाव्य ग्राहक ज्या देशात असेल त्याच्याजवळच्या समुद्रात उभे करून वाट बघितली जाते. जहाज बंदरात नेले जात नाही, कारण त्याचे पैसे द्यावे लागतात. एकदा ग्राहकाने तेलाचा भाव मान्य केला की मग जहाज बंदरात आणून डिलेव्हरी दिली जाते व पैसे घेतले जातात. हल्ली हा प्रकार डिजिटल पद्धतीने चालतो.
या सर्व प्रकारात सटोडियाला फक्त जहाजाचे भाडे द्यावे लागते. कधी कधी भाव वाढण्याची वाट दोन-दोन महिने बघितली जाते. सटोडियांना ते परवडणारे असते. कारण तेलवाहक जहाजाची क्षमता लाखो टनाची असल्याने कच्च्या तेलाचे भाव एका डॉलरने वाढले तरीही लाखो डॉलर फायदा होतो. अशाप्रकारे सटोडिये कच्च्या तेलाच्या व्यवसायात अक्षरश: कोट्यवधी डॉलर एका जहाजातून कमावत असतात.
जाता जाता एक माहिती साधारणत: व्हीएलसीसी क्षमतेच्या तेलवाहक जहाजाचे दिवसाचे भाडे ९ ते १० हजार डॉलर होते. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे ते सध्या १,६५,००० डॉलर प्रति दिवसावर पोहोचले आहे. यावरून सटोडिये किती पैसा कमावत असतात, याचा अंदाज वाचकांना येईल.
भारताची तेल साठवणूक क्षमता
जगभरचे देश साधारणत: ३० दिवस पुरेल एवढ्या तेलाची साठवणूक करतात. भारतात ही क्षमता केवळ १० दिवसाची आहे. भारतातील २१ रिफायनरी दररोज ४० ते ५० लाख कच्चे तेल शुद्ध करत असतात. सध्या भारताची तेल साठवणूक क्षमता ५३० लाख टनाची आहे. तेल साठवणूक क्षमता कर्नाटकातील पुडूर (२५० लाख टन), मंगळुरू (१५० लाख टन) तर आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम (१३० लाख टन) येथे आहे.