पैसा झाला खोटा; दहा रुपयांचे नाणे चालेना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:08 AM2021-09-23T04:08:47+5:302021-09-23T04:08:47+5:30
नागपूर : विविध बाजारपेठा, भाजी विक्रेते, किराणा दुकानदार, बस कंडक्टर, फूटपाथ विक्रेते आणि बँकांमध्ये पूर्वी सुट्या पैशांची मोठ्या प्रमाणात ...
नागपूर : विविध बाजारपेठा, भाजी विक्रेते, किराणा दुकानदार, बस कंडक्टर, फूटपाथ विक्रेते आणि बँकांमध्ये पूर्वी सुट्या पैशांची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवत होती. सुटी नाणी नसल्यास अनेकदा ग्राहक आणि प्रवाशांचे वाद व्हायचे. मात्र काही वर्षांमध्ये चलनात असलेल्या सुट्या नाण्यांची समस्या पूर्णपणे संपली आहे. एक, दोन, पाच आणि दहा रुपयांची नाणी आता बाजारात सहजरीत्या उपलब्ध आहेत. बँकांसह विविध दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात सुटी नाणी जमा होत आहेत. त्यामुळे आता नाणी नकोच, असे बोलले जात आहे. सुट्या नाण्यांची मागणी घटल्यामुळे बँकांकडेदेखील नाण्यांचा ढीग पडला आहे. त्यामुळे सुट्या नाण्यांचे नेमके काय करायचे, असा प्रश्न बँकांना पडला आहे. नेहमी बाजारात नाणे स्वीकारण्यावरून अफवा पसरत असल्याने ही नाणी चलनात आहे वा नाही, यावर अनेकदा संभ्रम निर्माण होतो. त्याचप्रमाणे १० रुपयांचे नाणे कुणी स्वीकारण्यास तयार होत नसल्याचे दिसून येत आहे.
रिझर्व्ह बँकेने दहा रुपयांचे नाणे सन २००९ मध्ये चलनात आणले. अजूनही ते चलनात असल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. दहा रुपयांची १४ प्रकारची नाणी वैध असून, सर्वांनीच त्याचा चलनात उपयोग करावा, असे आवाहन रिझर्व्ह बँकेने केले आहे.
कुठल्याही नाण्यावर बंदी नाही
बँकांमध्ये कुठल्याच नाण्यांवर बंदी नाही; पण डिजिटल पेमेंटमुळे लोक स्वीकारत नाहीत. याशिवाय सर्वच बाजारपेठांमध्ये नाणे स्वीकारण्यास कुणीही तयार होत नाही. सरकारने एक रुपया, दोन, पाच, दहा रुपयांवर बंदी घातलेली नाही. अनेकदा अफवा पसरत असल्यामुळे नाणी स्वीकारली जात नाहीत. डिजिटल पेमेंटमुळे सर्वच बाजारपेठांमध्ये नाणे स्वीकारणे जवळपास बंदच झाले आहे.
दहा रुपयांची नाणी नाकारली जातात
वजनात जड आणि आकाराला मोठी असणारी नाणी लोकांकडून नाकारण्यात येतात. यात मुख्यत्त्वे दहा रुपयांच्या नाण्याचा समावेश आहे. सुटी नाणी पर्समध्ये अथवा खिशात बाळगणे आता कठीण जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बँकांनी दहा रुपयांचे नाणे चलनात आणले आहे. हे नाणे आकाराला मोठे आणि वजनदार असल्यामुळे ते अनेकांना भार वाटत असल्याचे दिसून येत आहे.
बँकांमध्येही नाण्यांचा मोठा साठा
पूर्वी सुट्या पैशांची विशेषत: एक, दोन व पाच रुपयांच्या नाण्यांची चलनात कमतरता भासायची. मात्र आता ऑनलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध झाल्याने बँकांमधून सुट्या पैशांची मागणी घटली आहे. मात्र बँकांमध्ये चलनातील सर्वच नाणी स्वीकारली जातात. त्यामुळे बँकांमध्ये नोटांसहित दहा रुपयांच्या नाण्यांचाही मोठा साठा शिल्लक आहे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार नाण्यांचे वाटप करावे लागते; पण कुणीही स्वीकारत नाहीत.