७ महिन्याच्या चिमुकल्याच्या उपचारासाठी आणलेले पैसे खोटे बोलून उकळले
By नरेश रहिले | Published: October 13, 2023 07:04 PM2023-10-13T19:04:43+5:302023-10-13T19:05:03+5:30
थोड्या वेळासाठी केली ओळख: रेंगेपार पांढरी येथील एकाला अटक
नरेश रहिले, गोंदिया: थोड्या वेळासाठी ओळख करून खासगी रूग्णलयात असलेल्या महिलेकडून २५ हजार रूपये घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या सडक-अर्जुनी तालुक्याच्या रेंगेपार पांढरी येथील एकाला अटक केली आहे. ही कारवाई गोंदिया शहर पोलिसांनी केली आहे. हिवराज महादेव सुर्यवंशी (५२) रा. रेंगेपार ता. सडक-अर्जुनी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या जवळून २५ हजार रूपये रोख व मोटारसायकल जप्त करण्यात आली.
गोंदिया शहराच्या न्यु गोंदिया हॉस्पीटल बजरंग नगर, गोंदिया येथे मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील चिखली येथील कमल घोगु मस्करे (५३) यांनी २३ सप्टेंबर रोजी आपल्या ७ महिन्याच्या नातवाला उपचारासाठी दाखल केले. २६ सप्टेंबर २०२३ रोजी एका अनोळखी व्यक्तीने कमल मस्करे यांच्या परिचयाच्या लोकांची ओळख दाखवून जवळीक साधली. त्यांचा विश्वास संपादन केला. कमल मस्करे यांच्या मुलीला तुझ्या वडीलाने दवाखान्याचे बिल भरण्याकरीता तुझ्याकडे दिलेले २५ हजार रूपये मागितले असे खोटे सांगून ते पैसे घेऊन पसार झाला.
११ ऑक्टोबर २०२३ रोजी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिसांनी घटनास्थळाची माहीती व तांत्रीक विश्लेषन व गोपणिय सुत्रांच्या आधारे आरोपी हिवराज महादेव सुर्यवंशी (५२) रा. रेंगेपार, (पांढरी) ता. सडक-अर्जुनी याला अटक केली. त्याच्या कडुन २५ हजार रोख व गुन्हञयात वापरलेली मोटारसायकल जप्त केली.
अवघ्या १२ तासाचे आत आरोपीला अटक केली. तपास पोलीस हवालदार कवलपालसिंग भाटीया करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, पोलीस हवालदार कवलपालसिंग भाटीया, सुदेश टेंभरे, जागेश्वर उईके, प्रमोद चव्हाण, सतिश शेंडे, दिपक रहांगडाले, पोलीस शिपाई, मुकेश रावते, कुणाल बारेवार, सुभाष सोनवाने, दिनेश बिसेन, अशोक रहांगडाले यांनी केली आहे.
रक्त आणण्याच्या नावावर गंगाबाईत नेले
आरोपीने आपल्या आईचा अपेंडीसचा ऑपरेशन आहे असे सांगून तिला रक्त लागत आहे त्यासाठी चला गंगाबाई स्त्री रूग्णालयातून रक्त आणू म्हणून कमल घोगु मस्करे (५३) यांना गाडीवर बसवून गंगाबाई महिला रूग्णालयात नेले. गंगाबाई रूग्णालयाच्या तिकीट घराजवळ त्यांना थांबवून तो स्वत: दवाखाण्यात गेला. सकाळी ७:३० वाजता गंगाबाईत पोहचलेले कम सकाळी ९ वाजतापर्यंत म्हणजेच तब्बल दिड तास त्याची वाट पाहात होते. परंतु तो आरोपी परत आला नसल्याने त्यांनी पायी-पायी न्यू गोदिया दवाखाना, बजरंग नगर गोंदिया गाठले. तेथे गेल्यावर त्यांनी मुलीकडे दिलेले पैसे आरोपीने जमा करण्याच्या नावावर घेऊन गेल्याची बाब उघडकीस आली.