पैशाच्या वादात घडले अतुल हत्याकांड : मित्र शिवाच निघाला सूत्रधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:10 AM2018-01-11T00:10:05+5:302018-01-11T00:17:01+5:30
उधार घेतलेले पैसे परत मागितल्यामुळे दुखावलेला मित्र शिवा त्रिपाठी यानेच प्रॉपर्टी डीलर अतुल डहरवाल याचा खून केला. जुगार आणि मटक्याच्या सवयीने कंगाल झाल्यामुळे शिवाने साथीदारांच्या मदतीने अतुलचा खून केल्याचे सांगितले आहे. नागपूर आणि छिंदवाडा येथील तीन साथीदाराच्या मदतीने खून केल्याचे उघडकीस आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उधार घेतलेले पैसे परत मागितल्यामुळे दुखावलेला मित्र शिवा त्रिपाठी यानेच प्रॉपर्टी डीलर अतुल डहरवाल याचा खून केला. जुगार आणि मटक्याच्या सवयीने कंगाल झाल्यामुळे शिवाने साथीदारांच्या मदतीने अतुलचा खून केल्याचे सांगितले आहे. नागपूर आणि छिंदवाडा येथील तीन साथीदाराच्या मदतीने खून केल्याचे उघडकीस आले आहे. बुधवारी दिवसभर विचारपूस केल्यानंतर शिवाने कबुली दिली. छिंदवाडा पोलीस घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा करीत आहेत. ते शिवाच्या साथीदाराचाही शोध घेत आहेत.
गेल्या ८ जानेवारी रोजी अतुल डहरवाल याचा छिंदवाडा येथील लोधीखेडा येथे खून करण्यात आला. अतुल जामसावळी येथील हनुमान मंदिराच्या दर्शनासाठी गेला होता. तेव्हापासून त्याचा कुठलाही पत्ता नव्हता. ८ फेब्रुवारी रोजी त्याचे लग्न होणार होते. त्याची होणारी पत्नीसुद्धा छिंदवाड्याचीच आहे. अतुलने आपल्या भावी वधूला फोन करून छिंदवाड्याला आल्याचे सांगितले होते. परंतु तो घरी आला नाही आणि त्याचा मोबाईलसुद्धा बंद दाखवत असल्याने तिने अतुलच्या घरच्यांना सांगितले. ९ जानेवारी रोजी सकाळी छिंदवाडा पोलिसांना त्याचा मृतदेह आढळून आला. तेव्हा त्याचा खून झाल्याचे समजले. अतुल ८ जानेवारी रोजी जामसावळी येथे जाण्यापूर्वी शिवासोबत दिसून आला होता. त्यामुळे सर्वप्रथम शिवावरच लक्ष गेले. अतुलचा भाऊ गोलूला कारमध्ये एक डायरी सापडली. त्यात शिवासह अनेकांचे नाव लिहिले होते. अतुलला त्या लोकांकडून पैसे घ्यावयाचे होते. त्यानंतर शिवावरील संशय बळावला. छिंदवाडा पोलीस ८ जानेवारीपासूनच शिवाची विचारपूस करीत होते. तो सातत्याने आपले बया बदलवीत होता. ‘इलेक्ट्रॉनिक्स सर्व्हिलन्स’च्या मदतीने पोलिसांनी घटनास्थळाजवळ शिवासोबतच आणखी नागपूर व छिंदवाड्यातील संशयास्पद युवक असल्याचेही पुढे आले. त्यानंतर पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच शिवाने कबुली दिली.
सूत्रानुसार शिवा पाच-सहा वर्षांपूर्वी नागपूरला आला. अतुलचा भाऊ गोलूने चार वर्षांपूर्वी कामठी रोडवर एका युवकासोबत भागीदारीमध्ये हॉटेल सुरू केले होते. त्यात शिवा मॅनेजर होता. दोन वर्षांपूर्वी ते हॉटेल बंद केल्यानंतर शिवाने काम बंद केले होते. यानंतर तो क्रिकेटची सट्टेबाजी करू लागला. यातून त्याला क्रिकेट सट्टा व जुगाराचे व्यसन जडले. अतुलसोबत त्याची मैत्री होती. शिवाकडे कुठलाही कामधंदा नसल्याने त्याने शिवाला आपल्या हॉटेलमध्ये कामाला ठेवले होते. राहण्याचीही व्यवस्था नसल्याने त्याला आपल्याच घरी आश्रयसुद्धा दिला होता. याच दरम्यान शिवाने अतुलकडून लाखो रुपये कर्ज म्हणून घेतले होते. त्यावेळी अतुल प्रॉपर्टी डीलिंगसह कबाडीचाही व्यवसाय करीत होता. अतुलकडून उधारीवर घेतलेले पैसेसुद्धा शिवाने जुगारात गमावले. काही दिवसांपासून अतुल शिवाला आपले पैसे परत मागत होता. लग्न ठरल्याने त्याला पैशाची गरज होती. त्याने घरात फर्निचरचे कामही सुरू केले होते. अतुल शिवाला सातत्याने पैसे मागत होता. त्यामुळे शिवा दुखावला होता. आपण पैसे घेतल्याची बाब अतुलच्या घरच्यांना माहिती नसल्याचे शिवाला वाटत होते. पैसे परत करण्याचा कुठलाही मार्ग त्याला दिसून येत नव्हता. त्यामुळे त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने अतुलचा खून करण्याची योजना आखली. या योजनेंतर्गत शिवा व त्याचे साथीदार अतुलला जामसावळीला घेऊन गेल्याचा संशयसुद्धा व्यक्त केला जात आहे. दर्शन केल्यानंतर २.४० वाजता अतुल रेमंड कंपनीजवळील एका हॉटेलात नाश्ता करण्यासाठी आला. नियमित ग्राहक असल्याने हॉटेल चालकही त्याला ओळखत होता. अतुलचा खून रेमंड कंपनीपासून २० कि.मी. अंतरावरील साईखेडा येथे करण्यात आला. हे ठिकाण मुख्य रस्त्यापासून खूप दूरवर आहे. अतुल आरोपीसोबत सहजपणे तिथपर्यंत येण्याची शक्यता नाही. त्यामुळे अतुलला बेशुद्ध करून तिथे आणण्यात आले आणि नंतर त्याचा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे.
मुख्यमंत्र्यानी हस्तक्षेप करण्याची मागणी
प्रॉपर्टी डीलर अतुल डहरवालच्या खुनामुळे व्यापारीजगत आणि सामाजिक क्षेत्रात अतिशय संताप पसरला आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून गुन्हेगारांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. या प्रकरणात गुन्हेगारांवर तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. अतुल हा अनेक वर्षांपर्यंत भाजपा व शिवसेनेचा पदाधिकारी होता.