साेलर लावणाऱ्या ग्राहकांचा पैसा गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:08 AM2021-05-14T04:08:44+5:302021-05-14T04:08:44+5:30
कमल शर्मा नागपूर : ग्रीन एनर्जीला प्राेत्साहन देण्यासाठी घरांवर साेलर रूफ टाॅफ लावणारे जिल्ह्यातील ३००० आणि प्रदेशातील जवळपास एक ...
कमल शर्मा
नागपूर : ग्रीन एनर्जीला प्राेत्साहन देण्यासाठी घरांवर साेलर रूफ टाॅफ लावणारे जिल्ह्यातील ३००० आणि प्रदेशातील जवळपास एक लक्ष ग्राहकांना मे महिन्यात आलेले वीज बिल पाहून धक्का बसला आहे. महावितरणने त्यांचे क्रेडिट ॲडजस्टमेंटच गायब केले आहे. साेलर लावल्यामुळे या महिन्यात कमी बिल येण्याची अपेक्षा बाळगणाऱ्या ग्राहकांना हजाराेंचे बिल आले आहे. दरम्यान, महावितरणच्या म्हणण्यानुसार व्हेरीफिकेशन झाले नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. मात्र, महावितरणच्या बेजबाबदारपणाचा भार नागरिकांनी का भाेगावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
उल्लेखनीय म्हणजे साेलर रुफ टाॅप लावल्यानंतर नेट मिटरिंग करण्यात येते. याद्वारे उपयाेगात येणाऱ्या महावितरणच्या पारंपरिक विजेसह साेलर रुफ टाॅपद्वारे तयार झालेल्या विजेचेही रीडिंग घेतले जाते. दाेघांमधील अंतर पाहून वीज बिल आकारले जाते. मार्च संपताच वर्षभरात साेलर रुफटाॅपद्वारे झालेले अतिरिक्त विद्युत उत्पादन जाेडले जाते. प्रति युनिट ३.५० रुपये दरावर अतिरिक्त उत्पादनाचे शुल्क मे मध्ये एप्रिलच्या बिलात सम्मिलीत केले जाते. यालाच क्रेडिट ॲडजस्टमेंट असे म्हणतात. साधारणपणे १००० वर्गफुटाच्या छतावर लागलेल्या साेलर रुफटाॅपद्वारे २००० युनिटपर्यंत अतिरिक्त विजेचे उत्पादन हाेते. यानुसार मे महिन्यात आलेल्या बिलात ३.५० रुपये प्रति युनिटच्या दरानुसार ६५०० रुपयांची सूट संबंधित ग्राहकांना मिळणे अपेक्षित हाेते. मात्र, यावर्षी असे झालेच नाही. केवळ औद्याेगिक ग्राहकांनाच क्रेडिट ॲडजस्टमेंट दिले गेले. त्यामुळे घरी साेलर रुफटाॅप लावणाऱ्या ग्राहकांना महावितरणने झटका दिला, असे म्हणावे लागत आहे. उन्हाळ्यात अधिक बिल येत असल्याने क्रेडिट ॲडजस्टमेंटमधून दिलासा मिळू शकला असता.
पुढच्या महिन्यात हाेईल ॲडजस्टमेंट
यावर महावितरणचे म्हणणे आहे, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बिलिंग झाल्याने साेलर रुफटाॅपच्या बिलाचे व्हेरिफिकेशन हाेऊ शकले नाही. त्यामुळे मे महिन्यातील बिलामध्ये क्रेडिट ॲडजस्टमेंट जाेडणे शक्य झाले नाही. जूनच्या बिलामध्ये ही राशी समायाेजित करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात येत आहे.
महावितरण व्याज देणार काय?
विजेचे बिल भरण्यास उशीर झाला तर महावितरणद्वारे सामान्य माणसांवर व्याज लावले जाते. यावेळी महावितरणची चूक झाली आहे. त्यांच्या बेपर्वाईमुळे मे महिन्यात अधिक बिल ग्राहकांना मिळाले आहेत. आता त्यांनाच बिल भरण्याचा सल्ला देऊन पुढच्या महिन्यात क्रेडिट ॲडजस्टमेंट करण्याचे आश्वासन दिले जात आहे. अशावेळी महावितरण त्यांना एक महिन्याचे व्याज देणार काय, असा प्रश्न ग्राहकांनी उपस्थित केला आहे.