नागपुरात चाकू मारून रक्कम हिसकावून नेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 08:36 PM2020-06-02T20:36:39+5:302020-06-02T20:37:52+5:30
ओळखीच्या व्यक्तीच्या घरात शिरलेल्या चार आरोपींनी एका तरुणाला चाकू मारून पंधरा हजार रुपयांची खंडणी मागितली. ती देण्यास नकार दिल्यामुळे एका व्यक्तीच्या खिशातून पाच हजार रुपये हिसकावून नेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ओळखीच्या व्यक्तीच्या घरात शिरलेल्या चार आरोपींनी एका तरुणाला चाकू मारून पंधरा हजार रुपयांची खंडणी मागितली. ती देण्यास नकार दिल्यामुळे एका व्यक्तीच्या खिशातून पाच हजार रुपये हिसकावून नेले.
हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत इंद्रनगर न्यू नरसाळा परिसरात सोमवारी रात्री ही घटना घडली.
हरिभाऊ नानाजी नानोटकर (वय ५३) हे इंद्रनगरात राहतात. सोमवारी रात्री ७.३०च्या सुमारास नानोटकर, त्यांचा मुलगा अमर आणि अमरचा मित्र संदीप मस्के हे तिघे गप्पा करीत असताना कुख्यात गुन्हेगार कुणाल पांडुरंग उज्जैनकर (वय ३१, रा. इंद्रनगर) तसेच त्याचे साथीदार मनीष जळगावकर, मनोज फरांडे आणि कार्तिक असे चौघे जण दारूच्या नशेत टुन्न होऊन नानोटकर यांच्या घरात शिरले. ओळखीचे असल्यामुळे आणि दारूच्या नशेत दिसल्यामुळे नानोटकर यांनी त्यांना विरोध केला नाही. आरोपींनी घरात शिरताच शिवीगाळ सुरू केली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात पंधरा हजार रुपये उपचाराचा खर्च आला होता, ती रक्कम पाहिजे, असे सांगून नानोटकर यांना शिवीगाळ सुरू केली. रक्कम मिळावी म्हणून ते धमकावत होते. त्यामुळे नानोटकर यांच्या मुलाचा मित्र संदीप याने आरोपींना समजावण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी चाकू काढून त्याला मारला. त्यानंतर हरिभाऊ यांना धमकावून पंधरा हजार रुपयांची मागणी केली. त्यांनी रक्कम देण्यास नकार दिला असता त्यांच्या खिशातील पाच हजार रुपये हिसकावून घेतले. आरडाओरड ऐकून शेजारी गोळा झाल्यामुळे आरोपी पळून गेले. नानोटकर यांनी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी नोंदविलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून आरोपी कुणाल उज्जैनकर याला अटक केली. त्याच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत.