नागपुरातील तलावांवर आले मंगोलियन पाहुणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 11:19 AM2019-12-09T11:19:41+5:302019-12-09T11:20:44+5:30
शहराच्या आसपास असलेल्या अनेक तलावांवर सध्या मंगोलियन पाहुण्यांचे आगमन झालेले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराच्या आसपास असलेल्या अनेक तलावांवर सध्या मंगोलियन पाहुण्यांचे आगमन झालेले आहे. हे मंगोलियन पाहुणे म्हणजे ‘बार हेडेड गुज’ ऊर्फ हंस पक्षी होत. युरोपातील मंगोलिया येथून सुमारे ४ हजार ५०० कि मीचा प्रवास करून आणि हिमायलयाच्या ३० हजार फूट उंचावरून हे पक्षी अन्नाच्या शोधात भारतात दाखल झाले आहेत आणि सध्या त्यांचा मुक्काम हा जिल्ह्यातील तलावांवर राहणार आहे.
पक्षीतज्ज्ञांच्या मते सप्टेंबर, आॅक्टोबरच्या काळात जगभरातील पक्ष्यांच्या नैसर्गिक स्थलांतराची प्रक्रिया सुरू होते. मात्र वातावरणात झालेल्या बदलामुळे पक्ष्यांच्या स्थलांतरणावरही परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे दरवर्षी आॅक्टोबरच्या सुरुवातीच्या काळ हा मंगोलियन बार हेडेड गुज पक्ष्यांच्या आगमनाचा काळ मानला जातो. मात्र यावर्षी स्थलांतरणात महिनाभर उशीर झाला असून हे पक्षी डिसेंबर महिन्यात दाखल झाले आहेत. जीवनासाठी आवश्यक भोजन, पर्यावरण, प्रजनन आणि पिल्लांच्या पालन पोषणासाठी पोषक वातावरण शोधण्यासाठी हे पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून योग्य अधिवास शोधत असतात. हे स्थलांतरण विशिष्ट काळासाठी असते. बार हेडेग गुज पक्षी उन्हाळ्याच्या दिवसात युरोप तसेच तिबेटच्या भागात दिसून येतात. मात्र थंडी वाढली की मंगोलिया, सायबेरिया, रशिया, अलास्का, युरोप व कजाकिस्तान आदी उत्तर धु्रवाकडील देशांमध्ये या कालावधीत मोठ्या प्रमाणात बर्फ पडत असल्याने या पक्ष्यांचे स्थलांतरण सुरू होते आणि हे पक्षी हजारो किमीचा प्रवास करून आणि हिमालय पर्वत पार करून दक्षिण भारताकडे येतात. यानंतर प्रजनन कार्य व संगोपनासाठी मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नागपूर जिल्ह्यातील तलावांवर त्यांचा अधिवास असतो.
या भागात आहे मुक्काम
पक्षी अभ्यासक अविनाश लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील मटकाझरी, सायकी, वडगाव आदी तलाव पाण्याने भरलेले असतात. यामुळे आवश्यक असलेला अधिवास आणि खाद्यपदार्थ मिळत असल्याने या पक्ष्यांचा मुक्काम या भागात असतो. या पक्ष्यांचे थवे सध्या नागरिकांच्याही आकर्षणाचे केंद्र ठरले आहेत.