‘मॉनिटरिंग’ करणारी यंत्रणाच बाधित : मनपात ३८५ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 09:41 PM2020-09-15T21:41:22+5:302020-09-15T21:42:58+5:30
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बेशिस्त नागरिकांना शिस्त पाळण्याचे आवाहन करणारी व कोरोनाला आळा घालण्यासाठी मॉनिटरिंग करणारी महापालिकेची यंत्रणाच बांधित झाली आहे. मुख्यालय व झोन कार्यालयातील ३८५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून आतापर्यंत १७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बेशिस्त नागरिकांना शिस्त पाळण्याचे आवाहन करणारी व कोरोनाला आळा घालण्यासाठी मॉनिटरिंग करणारी महापालिकेची यंत्रणाच बांधित झाली आहे. मुख्यालय व झोन कार्यालयातील ३८५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून आतापर्यंत १७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मनपा मुख्यालयातील विभागप्रमुखही पॉझिटिव्ह आल्याने कामकाजावर परिणाम झाला आहे.
मृतांमध्ये गांधीबाग झोनमधील सात व शिक्षण विभागातील पाच तसेच सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मनपातील अनेक विभागप्रमुख पॉझिटिव्ह आहेत. शिक्षण विभागातील ३६ अधिकारी, कर्मचारी पॉझिटिव्ह आले. सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख, अधीक्षक, उपायुक्त, आरोग्य विभागाचे प्रमुख, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख यांचाही यात समावेश आहे. मनपात संसर्गाचा धोका वाढल्याने येथे येण्याचे नागरिकांनी टाळले पाहिजे. मुख्यालयातील प्रत्येक विभागात कमी-अधिक संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तसेच दहाही झोनमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद आहे. कोरोना बाधितांना उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न करणाऱ्या आरोग्य विभागात अनेकांना संसर्ग झाला आहे. यामुळे यंत्रणा प्रभावित झाली आहे.
नियोजन नाही, नियमांकडेही दुर्लक्ष
महापालिका मुख्यालय असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीत कायम वर्दळ असते. बैठका, आंदोलन, यामुळे होणारी गर्दी, लिफ्टचा वापर यामुळे संसर्गाचा कायम धोका असतो. पॉझिटिव्ह कर्मचारी आढळून आलेल्या विभागातील कर्मचाऱ्यांना अन्य विभागात ये-जा करावी लागते. वित्त विभाग, सामान्य प्रशासन व घनकचरा व्यवस्थापन विभागात कायम गर्दी असते. काही विभागात कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी प्रशस्त जागा नाही. फिजिकल डिस्टन्स ठेवणे शक्य होत नाही. नियोजनाचा अभाव संसर्ग वाढण्याला कारणीभूत ठरत आहे.
कामाशिवाय येण्याचे टाळा
शहरातील नागरिकांनी अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. मनपामध्ये कोणत्याही महत्त्वाच्या कामाविना येण्याचे टाळावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे. परंतु त्यानंतरही मनपा नागरिकांची ये-जा सुरूच आहे. झोनस्तरावर कामे झाली तर मुख्यालयात येणाऱ्यांची गर्दी कमी होण्याला मदत होईल.