‘मंकीपॉक्स’ची चाचणी आता नागपुरातही; ‘आयसीएमआर’ने दिली मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2022 09:29 PM2022-07-25T21:29:56+5:302022-07-25T21:30:29+5:30

Nagpur News ‘आयसीएमआर’ने नागपूर येथील ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे’ला (एम्स) ‘मंकीपॉक्स’ चाचणी करण्यासाठी मंजुरी दिली आहे.

'Monkeypox' test now in Nagpur too; Approved by ICMR | ‘मंकीपॉक्स’ची चाचणी आता नागपुरातही; ‘आयसीएमआर’ने दिली मंजुरी

‘मंकीपॉक्स’ची चाचणी आता नागपुरातही; ‘आयसीएमआर’ने दिली मंजुरी

Next
ठळक मुद्दे‘एम्स’चा सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचा पुढाकार

नागपूर : कोरोना संसर्गातून पूर्णपणे सावरलेले नसताना आता ‘मंकीपॉक्स’चा नवा विषाणू जगासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. सध्याची परिस्थिती पाहता ‘डब्ल्यूएचओ’ने जागतिक आणीबाणी जाहीर केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘आयसीएमआर’ने नागपूर येथील ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे’ला (एम्स) ‘मंकीपॉक्स’ चाचणी करण्यासाठी मंजुरी दिली आहे.

भारतासह ७५ देशांमध्ये ‘मंकीपॉक्स’ विषाणूची पुष्टी झाली आहे. आतापर्यंत १६ हजार ८३६ अधिक रुग्णांची नोंद झाली असून, ५ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. एकट्या भारतात ४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी केरळमध्ये ३ तर दिल्लीतील १ रुग्ण आहे. जगभरात ‘मंकीपॉक्स’ रुग्णांची वाढती संख्या पाहता ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने (आयसीएमआर) ‘नोडल लॅबोरेटरी’ म्हणून ‘एम्स’च्या ‘डायग्नोसिस लॅबोरेटरी’ला ‘मंकीपॉक्स’ चाचणीला मान्यता दिली आहे. ‘एम्स’च्या संचालक व मेजर जनलर डॉ. विभा दत्ता यांच्या मार्गदर्शनात सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. मीना मिश्रा यांनी या चाचणीसाठी पुढाकार घेतला आहे.

-‘आयसीएमआर’ने दिले प्रशिक्षण

डॉ. मीना मिश्रा यांनी सांगितले, ‘मंकीपॉक्स’ विषाणूच्या चाचणीसाठी ‘आयसीएमआर’ने ‘रिअल टाईम पीसीआर किट’ प्रदान केले आहे. शिवाय, डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. यामुळे आता चाचणीसाठी ‘एम्स’ची ‘लॅबोरेटरी’ पूर्णत: सज्ज आहे.

- ही आहेत लक्षणे

‘मंकीपॉक्स’ विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीला ताप, घसादुखी, श्वास घेण्यास त्रास होतो. याशिवाय शरीरात कांजिण्यासारखे पुरळ येतात, जे संपूर्ण शरीरात दिसू लागतात. पुरळाचा आकार मोठा असतो आणि त्यात पस भरलेला असतो.

- अशी केली जाते चाचणी

हा विषाणू शोधणे सोपे नाही, त्याची चाचणी प्रक्रियाही वेगळी आहे. यासाठी ‘आरटीपीसीआर’ चाचणी करावी लागते, परंतु नमुने घेण्याची पद्धत वेगळी आहे. कोविडमध्ये नाक किंवा घशाचा स्वॅब घेतला जातो, परंतु यामध्ये, रुग्णाच्या शरीरात तयार झालेल्या पुरळांमधील पाणी घेतले जाते आणि त्याची चाचणी केली जाते. या रोगाच्या निदानासाठी ‘क्लिनिकल’ आणि ‘डायग्नोस्टिक’ दोन्ही आवश्यक आहेत. क्लिनिकलमध्ये, तापाशिवाय रुग्णाला इतर कोणत्या समस्या आहेत हे पाहिले जाते. याशिवाय लॅबमध्ये त्याच्या आरटीपीसीआर चाचणीत ‘डीएनए’ने जुळला, तर तो ‘मंकीपॉक्स’ म्हणून अहवाल दिला जातो. सध्या देशात केवळ ‘एनआयव्ही’ पुणे येथेच याची चाचणी सुरू आहे, मात्र याशिवाय अन्य १५ प्रयोगशाळा यासाठी तयार करण्यात येत आहेत.

Web Title: 'Monkeypox' test now in Nagpur too; Approved by ICMR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य