वानर अन् माकडे म्हणे अभयारण्यात सोडणार!

By admin | Published: April 12, 2015 10:13 PM2015-04-12T22:13:36+5:302015-04-13T00:07:29+5:30

अफलातून योजना : वनविभागाने पाठवला शासनाकडे प्रस्ताव

Monkeys and Monkeys will be said to be in the park! | वानर अन् माकडे म्हणे अभयारण्यात सोडणार!

वानर अन् माकडे म्हणे अभयारण्यात सोडणार!

Next

रत्नागिरी : ग्रामीण भागामध्ये वानर, माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असताना वनविभागाच्या डोक्यातून एक अफलातून आणि तितकीच विनोदी ‘आयडिया’ आली आहे. वनविभागाने या माकडांना पकडून अभयारण्यात सोडण्याचा विडा उचलला आहे म्हणे! एवढंच नव्हे तर एवढ्या महत्त्वकांक्षेपोटी तब्बल ७९ लाख २७ हजार ४६५ रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.जिल्ह्यात अवघे ६९.३९ चौरस किलो मीटरएवढे वनक्षेत्र आहे. जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या मानाने वनांचे प्रमाण फक्त ०.८० टक्के एवढेच आहे. वनखात्याच्या ताब्यात असलेले वनक्षेत्र हे विखुरलेल्या स्वरुपात आहे. जिल्ह्यालगत असलेल्या कोल्हापूर वनविभागात चांदोली व कोयना अभयारण्ये आहेत. तसेच जिल्ह्याची भौगोलिक रचना पाहता सह्याद्री पर्वतरांगा, डोंगर, दऱ्या, नद्या आदींमध्ये जिल्हा विभागलेला आहे. येथील वनक्षेत्र आणि लगतची अभयारण्ये पाहता जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे.जिल्ह्यात जंगलतोडीचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे वानर, माकड, बिबटे लोकवस्तीकडे वळू लागले आहेत. वानर आणि माकडांकडून होणारा हा उपद्रव अगदी सहन करण्यापलिकडे गेलेला आहे. या प्राण्यांमुळे दरवर्षी भाजीपाला, शेती आदींचे नुकसान होते. जिल्ह्यात वानर, माकडांच्या होणाऱ्या उपद्रवाबाबत जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती, सर्वसाधारण सभांमध्ये याबाबत उदय बने व अन्य सदस्यांनी वेळोवेळी आवाज उठवून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी अनेकदा केली होती.
वनविभागाकडेही याबाबत वारंवार तक्रारी येत आहेत. त्यावर वनविभागाने एक भन्नाट आयडिया शोधली आहे म्हणे! वनविभागाने वानर व माकडे पकडण्यासाठी ७९ लाख २७ हजार ४६५ रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. वानर व माकडे पकडून ती अभयारण्यात सोडण्याच्या खर्चाचा प्रस्ताव वनविभागाकडून शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
वानर व माकडे पकडण्यासाठी गावच्या सरपंचांच्या देखरेखीखाली ग्रामसेवकांच्यामार्फत लवकरात लवकर हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर माकडांना पकडून त्यांचा बंदोबस्त त्यांना करता येईल का? असा सवाल मात्र गरीब शेतकऱ्यांकडून होत आहे. (शहर वार्ताहर)


तालुका लागणारी रक्कम
मंडणगड ४,२८,१००
खेड ३,१९,४१०
दापोली ११,००,९००
चिपळूण ५,०८,९५०
गुहागर २,७७,३५०
लांजा १५,०७,९२०
राजापूर ९,६९,३०५
संगमेश्वर १७,५१,५२०
रत्नागिरी १०,६४,०१०
एकूण ७९,२७,४६५



जिल्ह्यात माकड, वानरांकडून शेतातील पिके, फळभाज्या, घरांचे नुकसान.
जंगलतोडीमुळे माकडे लोकवस्तीकडे.
सरपंचांच्या देखरेखीखाली कार्यक्रम राबविणार.
जाणकार व प्रशिक्षित व्यक्तीकडून माकडे पकडणार.
तब्बल ७९ लाख २७ हजारांचा खर्च अपेक्षित असल्याचा शासनाकडे प्रस्ताव.

Web Title: Monkeys and Monkeys will be said to be in the park!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.