मान्सून १० दिवस उशिरा? ऊन-सावलीचा खेळ सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 10:37 AM2020-06-09T10:37:11+5:302020-06-09T10:39:29+5:30
सद्यस्थितीत गोवा, कोकण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडूतील काही भागात मान्सून सक्रिय झाला आहे. नागपुरात पाऊस येण्यासाठी आठ ते दहा दिवस लागू शकतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वसाधारणत: ७ ते ८ जूनदरम्यान मान्सून विदर्भात पोहचतो. परंतु यंदा मान्सूनचे ढग विदर्भात उशिराने पोहचण्याची शक्यता आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे हा परिणाम झाला असून पावसासाठी आणखी १० दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
नागपुरात ८ ते १० जूनदरम्यान मान्सून सक्रिय होतो. सद्यस्थितीत गोवा, कोकण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडूतील काही भागात मान्सून सक्रिय झाला आहे. नागपुरात पाऊस येण्यासाठी आठ ते दहा दिवस लागू शकतात. हवामान खात्यानुसार मागील चार दिवसात मान्सूनचा वेग मंदावला आहे. बंगालच्या खाडीत तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील ४८ तासात मान्सूनचे ढग गती घेतील. या बदलामुळे विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, छत्तीसगड, मध्य प्रदेश येथे ११ व १२ जून रोजी पाऊस येण्याची शक्यता आहे. यावर्षी नवतपाच्या मध्यातूनच मान्सूनपूर्व स्थिती चांगली झाली आहे. नागपूरसह विदर्भातील अनेक भागात चांगला पाऊस झाला आहे. यंदा मध्य भारतात १०३ टक्के पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मागील वर्षी २२ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. जूनच्या महिनाअखेरीस काही दिवसच पाऊस झाला होता. तर जुलै महिना बहुतांशपणे कोरडा गेला होता. त्यानंतर मात्र जोरदार पाऊस झाला होता. दरम्यान, सोमवारी नागपुरात पारा वाढला. दुपारपर्यंत चांगले ऊन पडले होते. दुपारी २.४५ च्या सुमारास ढग दाटून आले.