उपराजधानीतील पावसाळा व हिवाळाही प्रदूषित; केवळ ५८ दिवस शुद्ध हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2023 08:00 AM2023-01-08T08:00:00+5:302023-01-08T08:00:02+5:30

Nagpur News सरलेल्या २०२२ या वर्षातील ३६५ दिवसांपैकी तब्बल ३०३ दिवस प्रदूषणाचे हाेते आणि केवळ ५८ दिवस नागपूरकरांना शुद्ध हवा मिळाली.

Monsoon and winter in the sub-capital are also polluted; Pure air only for 58 days | उपराजधानीतील पावसाळा व हिवाळाही प्रदूषित; केवळ ५८ दिवस शुद्ध हवा

उपराजधानीतील पावसाळा व हिवाळाही प्रदूषित; केवळ ५८ दिवस शुद्ध हवा

Next
ठळक मुद्देसरत्या वर्षांतील ३६५ पैकी ३०३ दिवस प्रदूषणाचे

निशांत वानखेडे

नागपूर : वायू प्रदूषणाबाबत नागपूरकरांनी आता गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे, कारण दरराेज आपण घेत असलेला श्वास हा विषारी वायूने भरला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी) ने दिलेली आकडेवारी चिंताजनक आहे. सरलेल्या २०२२ या वर्षातील ३६५ दिवसांपैकी तब्बल ३०३ दिवस प्रदूषणाचे हाेते आणि केवळ ५८ दिवस नागपूरकरांना शुद्ध हवा मिळाली.

सीपीसीबीकडून मिळालेली नागपूरच्या गेल्या वर्षीच्या वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्युआय) ची आकडेवारी धक्कादायक आहे. यानुसार ५८ दिवस शुद्ध हवा, १६५ दिवस मध्यम प्रदूषण, १०१ दिवस अधिक प्रदूषण व ३७ दिवस आराेग्यास हानिकारक ठरणाऱ्या अत्याधिक प्रदूषित हाेते. चार दिवसाची आकडेवारी मात्र उपलब्ध नाही. विशेष म्हणजे कमी प्रदूषित राहणारा पावसाळा व आराेग्यदायी हिवाळासुद्धा गेल्या वर्षी प्रदूषणातच गेला. आणखी महत्त्वाचे म्हणजे ही आकडेवारी केवळ सिव्हील लाईन्स केंद्राची आहे. इतर ठिकाणी हवेची गुणवत्ता किती खाली गेली, याची कल्पनाच केलेली बरी.

पावसाळा, हिवाळाही प्रदूषित

पावसाळ्याच्या चार महिन्यामध्ये जूनमधले ३० पैकी २६ दिवस, ऑगस्टमध्ये ३१ पैकी १७ दिवस आणि सप्टेंबरचे ३० पैकी २३ दिवस प्रदूषण मध्यम स्वरुपाचे हाेते. केवळ जुलै महिन्यात ३१ पैकी २५ दिवस शुद्ध हवा आणि सहा दिवस प्रदूषण हाेते. हिवाळ्याचा विचार केल्यास ऑक्टाेबर महिन्यात ३१ पैकी २८ दिवस, नाेव्हेंबरमध्ये ३० पैकी २९ दिवस आणि डिसेंबरमध्ये ३१ पैकी ३० दिवस प्रदूषणातच गेले. जानेवारी २०२२ मधले ३१ पैकी २७ दिवस प्रदूषित हाेते. पावसाळ्यात १२२ पैकी ७२ दिवस आणि हिवाळ्यात १२३ पैकी ११५ दिवस प्रदूषण हाेते. उन्हाळ्याच्या चार महिन्यातील १२० पैकी सर्व दिवस नागपूरकरांना विषारी श्वास मिळाला.

एक्युआयची स्थिती किती दिवस आराेग्यास कसा

० ते ५०             ५८ चांगला

५१ ते १००             १६५ समाधानकारक पण रुग्णांसाठी त्रास

१०१ ते २००             १०१ मध्यम प्रदूषित- वृद्ध, लहान मुले, हृदयराेगी, फुप्फूस, दमा रुग्णांना धाेका

२०१ ते ३००             ३२ सर्वांच्या आराेग्यास हानिकारक

३०१ ते ४००             ०५ राहण्यास अयाेग्य

नवीन वर्षाचे प्रदूषणाने स्वागत

नवीन वर्षात सुरुवातीचे दिवसही प्रदूषितच ठरले. पहिले चार दिवस एक्युआय २०० च्या वर हाेता पण गुरुवारी आणि शुक्रवारी प्रदूषणाने ३०० एक्युआयचा आकडा पार केला. गुरुवारी ३३० एक्युआय व शुक्रवारी ३१६ एक्युआयची नाेंद झाली.

स्थानिक महापालिका, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार व इतर लाेकप्रतिनिधींनी प्रदूषण आणि आराेग्याचा विषय शासनाकडे लावून धरला पाहिजे. नागरिकांनीही गंभीरपणे विचार करण्याची वेळ आहे. केवळ कृती आराखडे नाही तर जमिनीवर कार्य झाले पाहिजे.

- प्रा. सुरेश चाेपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट साेसायटी

Web Title: Monsoon and winter in the sub-capital are also polluted; Pure air only for 58 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.