नागपुरात मान्सूनचे आगमन! रात्रभर पावसाची झमाझम; उकाड्याने हैराण नागरिक सुखावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2023 08:55 PM2023-06-23T20:55:18+5:302023-06-23T20:55:43+5:30
Nagpur News गेल्या महिनाभरापासून प्रचंड उकाड्याने हैराण असलेल्या नागपुरात गुरुवारी रात्री मान्सूनचे आगमन झाले. रात्री सुरू झालेल्या पावसाने थेट शुक्रवारी सकाळी ११:०० वाजताच्या सुमारास उसंत घेतली.
नागपूर : गेल्या महिनाभरापासून प्रचंड उकाड्याने हैराण असलेल्या नागपुरात गुरुवारी रात्री मान्सूनचे आगमन झाले. रात्री सुरू झालेल्या पावसाने थेट शुक्रवारी सकाळी ११:०० वाजताच्या सुमारास उसंत घेतली. हवामान खात्याने सकाळी ८:३० पर्यंत ३८.८ मिमी. पावसाची नोंद घेतली. पहिल्याच पावसाने शहरातील सखल भागात व दरवर्षीप्रमाणे यंदाही पुलाखाली पाणी साचल्याचे दिसून आले. मात्र, मान्सूनच्या पहिल्याच पावसाने वातावरणात काहीसा गारवा दाटला, नागपूरकरांना उकाड्यापासून उसंत मिळाली, आल्हाददायी वातावरण शुक्रवारी दिवसभर राहिले.
हवामान खात्याने २६ जूनपर्यंत जोरदार पाऊस कोसळेल असा इशारा दिला होता. पण २२ जूनलाच नागपूरवर मान्सून मेहरबान झाला. रात्रभर पावसाने चांगलीच रिपरिप लावून धरल्याने सकाळी कामधंद्यावर जाणाऱ्यांनी रेनकोट व छत्र्यांची शोधाशोध सुरू केली. लहानग्यांनी पावसात चिंब भिजण्याचा आनंद लुटला. पावसामुळे अनेकांनी सकाळी ११:०० पर्यंत घरातून पायच काढला नाही. दुपारी १२:०० नंतर पावसाने उसंत घेतली. पण, दिवसभर ढगाळ वातावरण व पावसाची रिपरिप सुरूच होती. पहिल्याच पावसाने वातावरण आल्हाददायी केल्याने आनंद लुटण्यासाठी अनेकांनी फुटाळा व अंबाझरी तलावाची सैर केली. प्रेमीयुगुलांनी शहरात दिवसभर दुचाकीवर सैर केली.
- २४ तासात ३८.८ एमएम पाऊस
गुरुवारी रात्री १०:०० नंतर पावसाला सुरू झाली. रात्रभर पाऊस सुरूच होता. हवामान खात्याने सकाळी ८:३०पर्यंत नोंदविलेल्या अंदाजानुसार ३८.८ एमएम पावसाची नोंद झाली आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे तापमानात २ डिग्रीने घट झाल्याचे निदर्शनास आले. सकाळपर्यंत कमाल तापमान ३८.३ अंश डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले.
...येथे साचले पाणी
रात्रभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे छत्रपती चौकातील रेल्वे पुलाखाली पाणी साचले होते. पुलाच्या एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली होती, तर एकाच मार्गाने दोन्ही बाजूची वाहतूक वळविण्यात आली होती. या मार्गावरून अवजड वाहनांची वर्दळ असल्याने पावसामुळे एका भागातील पुलाखालचा मार्ग बंद पडल्याने रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. मानस चौकात रेल्वे पुलाखालीही काही काळ पाणी साचले होते. तसेच शहराच्या सीमावर्ती असलेल्या सखोल भागामध्ये पाणी साचले होते. अविकसित लेआऊट व रस्त्यांची कामे सुरू असलेल्या वस्त्यांमध्ये पावसामुळे चिखल पसरला होता. शहरातील शंकरनगर चौक, राणी झाशी चौक, न्यू मनीषनगर अंडरब्रीज, मोक्षधाम रेल्वे पुलाखाली व मेडिकल चौकात काहीकाळ पाणी साचले होते.
- महाराजबाग चौकात अंदाज चुकला अन् गाडी घसरली
महाराजबाग चौकात सिमेंट रोडचे बांधकाम सुरू आहे. महाराजबागेच्या गेटपर्यंत रस्ता बनलेला आहे. पण, चौकात खोदकाम केले असल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी भरल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज बांधणे कठीण होत असल्याने दुचाकीचालक घसरून पडत आहेत.
- छत्री आणि रेनकोटसाठी गर्दी
मान्सूनच्या पावसाबरोबरच शहरात लागलेल्या छत्री आणि रेनकोटच्या दुकानांमध्ये गर्दी दिसून आली. यंदा छत्री आणि रेनकोटचे दर १० टक्क्यांनी वाढले आहे. शुक्रवारी लोकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली.