विदर्भात पावसाची रिपरिप; मात्र अद्याप ६८ टक्के बॅकलॉग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 11:40 AM2023-06-27T11:40:58+5:302023-06-27T11:43:37+5:30
भंडारा, यवतमाळ जिल्ह्यात वीज कोसळून ३ ठार, दोन जखमी
नागपूर : विदर्भात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ या जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. विदर्भाला अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा असली तरी सोमवारच्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. सामान्य नागरिकांनाही उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. यादरम्यान भंडारा जिल्ह्यात वीज कोसळून दोघांचा मृत्त्यू झाला तर यवतमाळ जिह्यात आर्णी तालुक्यातील शेंदूरसनी शिवारात एक महिला मजूर वीज कोसळून ठार झाली.
नागपुरात रविवारी रात्री सुरू झालेला पाऊस सोमवारी सकाळपर्यंत संथपणे संततधार सुरू होता. नागपुरात रात्रीच्या रिपरिपीनंतर सर्वाधिक ७८.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. सोमवारी दिवसभर मात्र आकाशात जमलेल्या ढगांनी शांतता बाळगली.
झाडाचा आधार घेतला अन् घात झाला..
भंडारा जिल्ह्यात सोमवार सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, भंडारा तालुक्यातील वाघबोडी शिवारात वीज कोसळून दोन शेतमजुरांचा मृत्यू झाला. ही घटना वाघबोडी येथील तेजराम बडोले यांच्या शेतात दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. यादवराव अर्जुन शहारे (६५) रा. विद्यानगर, भंडारा आणि रमेश श्रावण अंबादे (५२) अशी मृतकांची नावे आहेत. खरीप हंगाम अंतर्गत शेतात काम सुरू असतानाच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यावेळी या दोन्ही मजुरांनी पावसापासून बचाव करण्यासाठी शेतातीलच एका मोठ्या झाडाचा आधार घेतला. याचवेळी झाडावर वीज कोसळली. यात दोन्ही मजुरांचा जागीच मृत्यू झाला.
पेरणी करुन परतत असतानाच महिला मजुरांवर वीज कोसळली
यवतमाळ जिल्ह्यात मागील २४ तासांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. आर्णी तालुक्यातील शेंदूरसनी शिवारात पेरणी करून घरी परतत असलेल्या महिला मजुरांवर वीज कोसळली. यात एका महिलेचा मृत्यू झाला तर दोन जखमी आहेत. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली.
सखूबाई राजू राठोड (४७) असे मृत महिलेचे नाव आहे. तर संगीता गजानन डोल्हारकर आणि ज्योती किशोर राठोड या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. शेंदूरसनी येथील शेतात महिला मजूर पेरणीसाठी गेल्या होत्या. पेरणी झाल्यानंतर घराकडे येत असताना अचानक वीज कोसळली. यात त्या जखमी झाल्या त्यांना तातडीने आर्णी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. जखमी महिलांवर उपचार सुरू असल्याची माहिती नायब तहसीलदार यू. डी. तुंडलवार यांनी दिली.
मुसळधार पावसाची गरज
विदर्भात पावसाची तूट अद्यापही ६८ टक्के आहे. विदर्भात मान्सून बराच उशिरा म्हणजे २३ जूनला सक्रिय झाला. अति जोरदार पावसाचा इशारा दिला असला तरी अद्यापही त्याप्रमाणे बरसला नाही. त्यामुळे जून महिन्याची एकूण सरासरी गाठायला पुढल्या चार दिवसात मुसळधार पावसाची गरज आहे. रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे मात्र मोठी तूट भरून काढायला मदत मिळाली. विदर्भात या महिन्यात १४० ते १५० मि.मी. पावसाची नोंद अपेक्षित होती पण आतापर्यंत केवळ ४४.६ मि.मी. पावसाचीच नोंद झाली आहे. त्यामुळे पावसाचा बॅकलॉग ६८ टक्क्यांवर आहे. नागपुरात ही तूट सर्वात कमी ४३ टक्के आहे. इतर जिल्ह्यात मात्र ७५ ते ८० टक्के बॅकलॉग बाकी आहे.
कुठे किती पाऊस
सोमवारी दिवसा ब्रम्हपुरी २० मि.मी. व गोंदियामध्ये १८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. त्याखाली गडचिरोली व अकोल्यात ५ मि.मी. पाऊस झाला. इतर जिल्ह्यात ढगांचा जोर शांत होता. रविवारी रात्री मात्र नागपूरनंतर चंद्रपूरला ५७.४ मि.मी., अमरावती २२.२ मि.मी., भंडारा २० मि.मी., यवतमाळ ४० मि.मी. वर्धा २७.७ मि.मी. व अकोल्यात १८.९ मि.मी. पाऊस झाला.
सर्वदूर पावसामुळे दिवसाचे तापमान मोठ्या प्रमाणात खाली घसरले, अकोला, अमरावतीत ५.९ व ४.८ अंशाने पारा घसरला. यवतमाळमध्ये सर्वाधिक ७.५ अंशाने घसरत २७.२ अंशावर पोहोचला. नागपुरात सर्वाधिक ३२ अंश तापमानाची नोंद झाली. रात्रीचा पारा मात्र सरासरीच्या खाली घसरला आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती तूट?
जिल्हा - तूट (टक्के)
- नागपूर - ४३
- गोंदिया - ७४
- भंडारा - ७२
- चंद्रपूर - ७०
- गडचिरोली - ७४
- वर्धा - ५८
- अमरावती - ६४
- अकोला - ८७
- यवतमाळ - ६९
- बुलढाणा - ८२