पावसाळी अधिवेशन पुन्हा मुंबईत : नवीन सरकारचे हिवाळी अधिवेशन नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:03 AM2019-05-11T00:03:55+5:302019-05-11T00:10:09+5:30
पावसाळी अधिवेशन पुन्हा मुंबईतच होणार असून, नागपुरात पूर्वीप्रमाणे हिवाळी अधिवेशन होणार आहे. राज्यपाल कार्यालयाने त्याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. पावसाळी अधिवेशन नागपुरात घेऊन नवीन पायंडा पाडणाऱ्या भाजप सरकारला पावसाने झोडपून काढले. पावसामुळे अधिवेशनाचे कामकाज बंद पाडण्याची वेळ सरकारवर आली. त्यामुळे पावसाळी अधिवेशन पुन्हा मुंबईत घेण्यात येत असल्याचे सांगितले जाते. १७ जूनपासून अधिवेशन सुरू होणार असून, राज्यपालांनी तशी अधिसूचनाही काढली आहे तर, परंपरेनुसार हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार आहे. जे नवीन सरकार आल्यानंतरचे असेल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाळी अधिवेशन पुन्हा मुंबईतच होणार असून, नागपुरात पूर्वीप्रमाणे हिवाळी अधिवेशन होणार आहे. राज्यपाल कार्यालयाने त्याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. पावसाळी अधिवेशन नागपुरात घेऊन नवीन पायंडा पाडणाऱ्या भाजप सरकारला पावसाने झोडपून काढले. पावसामुळे अधिवेशनाचे कामकाज बंद पाडण्याची वेळ सरकारवर आली. त्यामुळे पावसाळी अधिवेशन पुन्हा मुंबईत घेण्यात येत असल्याचे सांगितले जाते. १७ जूनपासून अधिवेशन सुरू होणार असून, राज्यपालांनी तशी अधिसूचनाही काढली आहे तर, परंपरेनुसार हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार आहे. जे नवीन सरकार आल्यानंतरचे असेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रहाने पावसाळी अधिवेशन नागपुरात घेतले होते. हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी असतो. निधीही संपलेला असतो. त्यामुळे वैदर्भीयांना न्याय देता येत नाही, असा युक्तिवाद भाजपतर्फे करण्यात आला होता. विरोधकांनी मात्र मोर्चे, आंदोलनाला सरकार घाबरत असल्याचे सांगून आरोपही केले होते. मुंबईतील मनोरा आमदार निवास पाडणार असल्याने आमदारांची गैरसोय होईल, असाही तर्क लावला जात होता. सर्व आरोपानंतरही सरकारने अधिवेशन नागपूरला घेतले. ४ जुलैपासून अधिवेशनाला सुरुवात झाली. मात्र पावसाने धुमाकूळ घातला. विधानसभेच्या इमारतीत पाणी घुसले. वीज यंत्रणा असलेल्या खोलीत पाणी घुसले. त्यामुळे वीज पुरवठा खंडित करावा लागला. या सर्व गोंधळामुळे संपूर्ण दिवसाचे कामकाज बंद ठेवण्याची नामुष्की सरकारवर ओढवली होती. त्यामुळे यंदा पावसाळी अधिवेशन पुन्हा मुंबईत घेण्यात येणार आहे.